लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हयात कोरोनाचे थैमान सुरू असताना आता कोविडपश्चात आजाराने डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येऊ लागल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. या आजाराने गुरुवारी तब्बल सहाजणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या १९ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत ११४ रुग्ण आढळले आहेत. त्यातील एका रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला होता, तर सहा रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला आहे.
तसेच या आजारातून ३५ जण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
त्याचबरोबर एकूण ३४ जणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, इतर ११ रुग्णांवर ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित झालेल्यांमध्ये हा बुरशीजन्य आजार वाढत असल्याचे समोर आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. अनेक खासगी रुग्णालयांत असा रुग्णांची नोंद असताना आरोग्य यंत्रणेला याबाबत माहिती कळवली जात नसल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत संबंधित आरोग्य यंत्रणेला आदेश दिल्यानंतर तत्काळ जिल्ह्यातील खासगी डॉक्टर, सरकारी डॉक्टर नाक, कान, घसतज्ज्ञ, डोळ्यांचे तज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, फिजिशियन यांची बैठक झाली. त्यात याबाबत रुग्ण आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागास माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येऊन धडकली. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या लाटेत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये डोळे आणि नाकामध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तक्रारीत वाढ झाली आहे. डोळ्यांना सुज, नाकाला सुज, डोळे लाल होणे अशी सुरुवातीला लक्षणे आढळतात. मधुमेह असलेल्या रुग्णांना हा आजार अधिक संभवतो. आजार वाढल्यास मेंदूपर्यंत जाऊन रुग्णाच्या जिवावर बेतू शकते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. येथील खासगी रुग्णालयासह जिल्हा रुग्णालय व काही रुग्णांवर पुण्यात उपचार सुरू आहेत. कोविड बरा झालेल्या काही रुग्णांना हा आजार संभवतो. डोळे आणि नाकाला इन्फेक्शन होते. प्रसंगी काही जणांना आपला डोळादेखील गमवावा लागला आहे. या आजाराचे रुग्ण सर्वत्र वाढत आहेत. रुग्णांनी आजाराची लक्षणे ओळखून वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. सायनसमध्ये नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत बुरशी साठून राहते. ही बुरशी हवेतून पसरते. ज्या व्यक्तीला याचा संसर्ग झाला आहे, अशा व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्यांना याचा त्रास होत नाही; पण ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांच्यासाठी ही बुरशी घातक आहे.