मसूर : मसूर (ता. कऱ्हाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने लसीकरणाचा सोळाशेचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला असून, लसीकरण प्रक्रिया नियोजनबद्ध व सामाजिक अंतर राखून होत असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. सध्या मसूर व परिसरातील दुकानदार, व्यापारी यांची तपासणी युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांनी दिली.
गेल्या तीन आठवड्यांपासून मसूर आरोग्य केंद्रात नोंदणी कक्ष, प्रमाणिकरण कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष अशा स्वतंत्र कक्षांचे नियोजन करण्यात आले असून, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, डॉ. राजेंद्र डाकवे यांनी आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आजअखेर जवळपास सोळाशे लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. या लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता.
आरोग्य केंद्रात नागरिकांना बैठक व्यवस्था, लसीकरणासंदर्भात आरोग्य शिक्षणाचे बोर्ड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच कोविड लसीकरणासंदर्भात योग्य मार्गदर्शन करण्यात येत असून, आरोग्य केंद्राबरोबरच मसूर भागातील ६ उपकेंद्रांमध्ये कोविडची लस उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचा ग्रामीण भागातील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. रमेश लोखंडे यांनी केले.
सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राला दररोज २००चे लसीकरण उद्दिष्ट तर उपकेंद्रात शंभरचे उद्दिष्ट दिले आहे, असे सांगून डॉ. लोखंडे म्हणाले, मसूर आरोग्य केंद्रात नियमित आरोग्यसेवकांची पाच पदे रिक्त असूनही नियोजनबद्ध कामकाज सुरु असून, कोणाचीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
या लसीकरण कार्यक्रमामध्ये सुरेखा सुतार, निनया जाधव, आरोग्यसेवक संदीप जाधव, वनिता हजारे हे लसीकरण कक्षात कामकाज पाहात आहेत तर लस टोचण्याचे काम उपकेंद्राच्या धनश्री देशपांडे, सविता रुपनर, टी. एस. मुल्ला, ज्योती जाधव, मंगला मुळीक आदी पाहात आहेत.
फोटो कॅप्शन - मसूर येथे लसीकरणप्रसंगी डॉ. लोखंडे व कर्मचारी वर्ग