दहिवडी : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरुवारी दहिवडीतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहराला भेट देऊन कोरोनाचा आढावा घेतला. त्यानंतर शुक्रवारी दुसऱ्याच दिवशी आणखी सोळा कोरोनाबाधित रुग्ण वाढले. यामुळे दहिवडीतील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वच प्रशासन सक्रिय झाले आहे.
आरोग्य विभागाने सर्दी, खोकला, ताप येत असल्यास तातडीने आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी. कोणीही दुखणे अंगावर काढू नये यासाठी सिध्दनाथ मंदिर चावडी चौक अंगणवाडी, आंधळी पुनर्वसन शाळा, पोलीस कचेरी मैदान येथील वीर सावरकर अभ्यासिका या ठिकाणी सोय करण्यात आली आहे.
‘नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही, मात्र काळजी घ्यावी, मास्क वापरणे सॅनिटायझरचा वापर करणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्स पाळले, तरच आपण कोरोनाला हरवू शकतो. त्यामुळे नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे,’ असे मत तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर यांनी व्यक्त केले.
तसेच अनेक ठिकाणी बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले लोक माहिती लपवत आहेत. वेळीच उपचार घेतल्यास आपण सहज मात करू शकतो असे त्यांनी सांगितले.
चौकट
निष्काळजीपणे व नियम मोडून वागणारे असतील त्यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर सकाळी फिरायला जाणाऱ्यांचे प्रमाण बंद झाले. त्यामुळे शुक्रवारी रस्ते ओस पडले होते.
एकूण संख्या ५१४
पुन्हा सोळाजणाचे अहवाल बाधित आले असून १ फेब्रुवारीपासून १८१ जणाचे अहवाल कोरोणा बाधीत आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधीताची संख्या ५१४ वर गेली आहे. सद्या १११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ७४ रूग्ण घरी विलगीकरणात आहेत. ४७ रूग्णावर विविध हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांनी दिली
फोटो २६दहिवडी
दहिवडीत कडकडीत लाॅकडाऊन असल्याने शुक्रवारी रस्ते ओस पडले होते. (छाया : नवनाथ जगदाळे)