पाचगणी : महाबळेश्वरच्या पश्चिम पट्ट्यात गुरुवारच्या पावसाने अतोनात नुकसान झालं; परंतु सर्वच माहिती समोर आलीच नव्हती. सोळशी नदीने पात्र ५० फुटांनी रुंद केल्याने येरण गावच गिळंकृत केले. तीनशे लोकवस्तीच्या गावाचे होत्याचे नव्हते झाले. हे मंगळवारी उघडकीस आले.
कोयना नदीच्या रौद्ररूपाने झालेल्या विध्वंसाची माहिती समोर आली. मात्र सोळशी खोऱ्यातील माहिती नजरेआड राहिली होती. गुरुवारी सोळशी नदीने रौद्ररूप धारण केल्याने येरण गाव नदीपात्राने कवेत घेतले होते. डोंगरकड्यांनी भूस्खलन करीत गावच्या दिशेने आक्रमण केले. त्याचबरोबर डोंगर उतारावरून वाहणाऱ्या पाण्याने गावात थैमान घातल्याने गावातील ग्रामस्थ भयभीत झाले होते. यामध्ये अनेक घरे जमीनदोस्त झाली. जनावरे दगावली, पुराच्या पाण्यात वाहून गेली.
भात शेती वाहून गेली. आता शेतीच उरली नाही. त्यामुळे ना निवारा उरलाय, ना शेतजमीन. सर्वच नष्ट झाले आहे. त्यामुळे येरणे गावातील नागरिक हैराण झाले आहेत. सर्वच व्यवस्था कोलमडून पडली आहे. आता जगायचे कसे, असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. रस्ते तर उरलेत नाहीत. सोळशी नदीने सर्वच गिळंकृत केले आहे. नदीपात्राने स्वतःची जागा ५० फुटांनी रुंद केल्याने सर्वत्र हाहाकार झाला आहे. येथे मात्र अजून कोणतीच मदत पोहोचली नाही.
चौकट :
स्थलांतरित करण्याची याचना
शंभर घरांच्या येरणे गावात ३०० लोकसंख्या आहे. यातील ७० टक्के गाव आणि गावाची शेतजमीन पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झाली आहे. गावातील लोक तिथेच अडकून राहिले आहेत. गावाच्या तिन्ही बाजूला डोंगर आहेत. तेही अतिवृष्टीने खचले आहेत. पुन्हा अतिवृष्टीच्या भीतीने सर्वच भयभीत झाले आहेत. गावातील आबालवृद्धापासून सर्वच एकच म्हणतायेत आम्हाला स्थलांतरित करा.