सातारा/ दहिवडी : दहिवडी (रानमळा) येथील दत्तात्रय जगन्नाथ जाधव (वय ३८) या युवकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील स्वाइन फ्लूचा हा सहावा बळी ठरला आहे. दरम्यान, तपासणी झालेल्या तीन संशयित रुग्णांना ही लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आणखी चार संशयित रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले आहेत. दहिवडी भागातच १५ दिवसांपूर्वी खताळ वस्तीतील विजया खताळ या महिलेचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला होता. त्यानंतर या भागातील हा दुसरा बळी असल्याने माण तालुक्यातील नागरिक धास्तावले आहेत. दत्तात्रय जाधव यांना २७ तारखेला दहिवडीतील खासगी रुग्णालयात तपासल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून चार दिवसांपूर्वी त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, स्वाइनबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावून सर्व संबंधितांना सूचना दिल्या. तसेच, जिल्हा रुग्णालयातही वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा आणि आढावा बैठक घेण्यात आली.रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यापैकी तिघांना स्वाइन फ्लूची बाधा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. या तीन व्यक्ती दहिवडी (ता. माण), नागठाणे (ता. सातारा), मेढा (ता. जावली) येथील आहेत. तसेच, सोमवारी स्वाइन फ्लूचे आणखी चार संशयित रुग्ण उपचारार्थ दाखल झाले असून, ते बाधित आहेत किंवा कसे, हे मंगळवारी त्यांच्या अहवालावरून स्पष्ट होईल.दरम्यान, स्वाइन फ्लूचा वाढता विळखा विचारात घेऊन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी संबंधितांची तातडीची बैठक त्यांच्या कक्षात बोलावली होती. राज्याचे आरोग्य सहायक संचालक डॉ. आवटी आणि पुण्याचे सहायक संचालक डॉ. दर्शने या बैठकीला उपस्थित होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह खासगी रुग्णालयांचे डॉक्टर, इंडियन मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आदी संघटनांच्या प्रतिनिधींना तसेच वैद्यकीय अधीक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील हेही उपस्थित होते. स्वाइन फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. संशयित रुग्णावर उपचार सुरू होण्यास विलंब होऊ नये, खासगी रुग्णालयांमध्येही जेथे व्हेन्टिलेटरची सुविधा उपलब्ध आहे तेथे संशयित रुग्णांना तातडीने दाखल करून घ्यावे, कोणत्याही संशयित रुग्णावर उपचार टाळू नयेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. ज्यांना स्वाइन फ्लूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यांच्या निकटवर्तीयांची तपासणी आणि सर्वेक्षण प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे करण्यात यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व औषध दुकानदारांनी टॅमी फ्लूच्या गोळ्या उपलब्ध कराव्यात, अशी सूचना अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आली. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन‘स्वाइन फ्लूचा संशय आल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. औषधोपचार वेळेवर सुरू झाल्यास स्वाइन फ्लू निश्चित बरा होत असल्याने तपासणी टाळून दुखणे अंगावर काढू नका,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद््गल यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’चा सहावा बळी
By admin | Published: August 31, 2015 9:01 PM