सातारा : कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी सातारा पालिकेकडून शहरातील व्यापारी, विक्रेते व दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांत १ हजार २५० व्यापाऱ्यांची चाचणी करण्यात आली असून, यामध्ये तब्बल ६० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सातारकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. मार्च महिन्यात दोन हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पालिकेने नागरिकांमध्ये जनजागृती करतानाच शिबिराचे आयोजन करून शहरातील व्यापारी, दुकानदार, हातगाडीधारक व विक्रेत्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरात ही मोहीम सुरू आहे.
आतापर्यंत गांधी मैदान चौपाटी, रविवार पेठ, बसस्थानक परिसर, सेव्हन स्टार इमारत, पोवई नाका, सदाशिव पेठ आदी ठिकाणच्या १ हजार २५० व्यापारी व विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल टप्प्याटप्प्याने प्राप्त होत असून, गुरुवारी आलेल्या अहवालानुसार शहरातील तब्बल ६० व्यापारी व विक्रेते कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. सातारा शहरासाठी ही चिंतेची बाब असून, पालिकेच्या कोरोना पथकाकडून बाधित विक्रेत्यांची माहिती घेऊन तातडीने त्यांची दुकाने सील करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. संबंधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी देखील कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
(चौकट)
चौपाटीवरील एक जण बाधित
तब्बल एक वर्षानंतर गांधी मैदानावरील चौपाटी सुरू झाली; परंतु ही चौपाटी सुरू करण्यापूर्वी येथील ७५ विक्रेत्यांनी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कोरोना चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल समोर आला असून ७५ पैकी एक जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्तीची खाद्यपदार्थाची गाडी बंद ठेवण्यात आली असून, गेल्या तीन दिवसांत चौपाटीवरील केवळ आठ-दहा गाड्याच सुरू करण्यात आल्या आहेत.