सातारा : महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका व अंगणवाडी सेविका संघाच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केल्यानंतर जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून ‘बांगर हटाव’चा जोरदार नारा दिला. दरम्यान, यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांनी दि. २० पर्यंत मागण्याची पूर्तता करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. हे आश्वासन पूर्ण न झाल्यास संघटनेने दि. २२ रोजी पुन्हा जिल्हा परिषदेत ठाण मांडण्याचा इशारा दिला आहे.अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी सुरुवातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे अर्धा तास या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर अंगणवाडी सेविका जिल्हा परिषदेकडे गेल्या. मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, दुपारच्या सुमारास अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी जिल्हा परिषदेवर विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यावेळी संघटनेच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवदास यांना निवेदन देण्यात आले. शिवदास यांनी दि. २० पर्यंत सर्व थकित मानधन व टीएडीए दिला जाईल. अंगणवाडीला रेशनिंग धान्य व्यवस्था मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. शासनाच्या निर्धारित वेळेतच अंगणवाडीचे कामकाज होईल, असे आश्वासन दिले. या आंदोलनात संघटनेचे महासचिव शौकतभाई पठाण, कॉ. शिवाजी पवार, विमल चुनाडे, अलका झेंडे, संगीता बाइंग, सुजाता ननवरे, मालन जाधव, छाया पन्हाळकर, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
झेडपीसमोर ‘बांगर हटाव’चा नारा
By admin | Published: July 07, 2014 11:03 PM