सातारा : पुण्याहून कोल्हापूरला निघालेली भरधाव कार शेंद्रे, ता. सातारा येथे महामार्गावर पलटी होऊन आठ वर्षांची चिमुकली जागीच ठार झाली. मृत मुलगी कागल तालुक्यातील आहे. हा अपघात सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास झाला.
अनया सुनील चौगुले (वय ८, रा. कसबा सांगवा, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे अपघातात ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील चाैगुले हे पत्नी व मुलीसमवेत कारने नातेवाइकांकडे पुणे येथे गेले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी ते कोल्हापूरला निघाले होते. यावेळी पत्नी पुढील सीटवर बसली होती तर त्यांची मुलगी अनया ही पाठीमागच्या सीटवर बसली होती.
महामार्गावरील शेंद्रे येथे पोहोचल्यानंतर समोर पिकअप टेम्पो होता. या टेम्पोच्या डाव्या बाजूने ओव्हरटेक करत असताना अचानक भरधाव कार पलटी झाली. तीन ते चार पलट्या घेत कार नाल्यात पडली. वडील सुनील चाैगुले आणि त्यांच्या पत्नीने सीटबेल्ट लावले होते. त्यामुळे या अपघातात दोघांनाही फारसी जखम झाली नाही. मात्र, पाठीमागच्या सीटवर बसलेली अनया गंभीर जखमी झाली. तिच्या पायाला आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवालदार संजू गुसींगे यांनी घटनास`थळी धाव घेऊन जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सातारा शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.