कऱ्हाड : रेठरे बुद्रुक, (ता. कऱ्हाड ) येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी सहाजणांनी अर्ज दाखल केले, तर दिवसभरात १३७ अर्जांची विक्री झाली आहे.कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारपासून सुरुवात झाली असून १ जूनपर्यंत त्यासाठी मुदत आहे, तर २ जूनला सकाळी अकरा वाजल्यापासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्जांची छाननी होणार आहे. ३ ते १७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत असून १८ जूनला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे, तर २९ जूनला मतदान होणार आहे.उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले गटाकडून विद्यमान संचालक धोंडिराम जाधव यांनी वडगाव हवेली-दुशेरे गटातून अर्ज दाखल केला आहे, तर याच गटातून कुसुर येथील विश्वास आत्माराम शिंदे, विंग येथील तानाजी पांडुरंग खबाले आणि कोडोली येथील गजानन सुभाष जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
वडगाव हवेली-दुशेरे गटातून पहिल्याच दिवशी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, तर अन्य दोन उमेदवारी अर्ज रेठरे हरणाक्ष-बोरगाव आणि रेठरे बुद्रुक-शेणोली या गटातून दाखल करण्यात आले आहेत. वाळवा तालुक्यातील बहे गावचे संतोष भगवान दमाने यांनी, तर रेठरे बुद्रुक येथील महेश भास्कर कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पहिल्याच दिवशी सुमारे १३७ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांनी दिली आहे.