तांबवे : स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या तांबवे येथे ग्रामपंचायत निवडणूक लागली असून, तेरा जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक दुरंगी होत आहे. सत्ताधाऱ्यांचे भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल विरोधात भैरवनाथ ग्रामविकास आघाडी पॅनेलच्या उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे.
तांबवे गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक लागली असतानाही कसलीही पोस्टरबाजी नाही. त्यामुळे वातावरण खेळीमेळीत आहे. दोन्ही गटांतील नेत्यांनी बॅनरबाजी न करता सोशल मीडियाचा वापर करून प्रचारात जोर धरला आहे. प्रभागनुसार सभा घेऊन प्रत्येकजण आपापल्या पॅनेलचे विकासाचे मुद्दे मांडत मतदारांना मत मागत आहेत. गाठीभेटी, कोपरासभा घेऊन प्रचार करीत आहेत. सत्ताधारी गटातील काही उमेदवार दुसऱ्या गटाला मिळाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. गावामध्ये दोन्ही गटातील कुणीही फलक लावलेले नाहीत. घरोघरी भेटी देऊन ते प्रचार करीत आहेत. सर्वच उमेदवारांनी सोशल मीडियाचा प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचे दिसून येत आहे.
सत्ताधारी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल गत पाच वर्षांत काय विकासकामे केली, हे सांगत विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत, तर विरोधी भैरवनाथ ग्रामविकास आघाडी पॅनेलचे उमेदवार गावाला सत्ताधाऱ्यांनी गत पाच वर्षांत कसे वेठीस धरले, हे ठासून सांगत आहेत. भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्री कारखाना संचालक रामचंद्र पाटील, सतीश पाटील, माजी सरपंच पी. डी. पाटील, दिलीप पाटील, अशोक पाटील हे करीत आहेत, तर भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व यशवंत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष निवासराव पाटील, माजी उपसरपंच आनंदा ताटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अण्णासाहेब पाटील, विद्यमान उपसरपंच धनंजय ताटे, विठोबा पाटील हे करीत आहेत.