धामणेर : धामणेर येथील कोकीळ विद्युत ट्रान्स्फॉर्मरचे वादळी वाऱ्याने विद्युत खांब पडले होते. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पडलेले खांब सरळ करून शेतीपंपाचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत माहिती अशी की, परिसरामध्ये कृष्णा नदीवरील कोकीळ विद्युत ट्रान्स्फॉर्मरचे दहा दिवस वादळी वाऱ्याने पोल पडल्यामुळे पंप बंद होता. शेतकऱ्यांची वारंवार येथील तीनशे एकर बागायती शेतीची पिके उन्हाळी काळात पाण्याअभावी धोक्यात येऊ लागली आहेत. खांबाचे काम करा अशी अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनसुद्धा दुरुस्तीचे काम होत नव्हते. केवळ बिले भरा एवढे कारण दाखवून अधिकारी चाल-ढकल करत होते. प्रामाणिकपणे बिले भरणाऱ्या शेतकऱ्यांना याचा त्रास देण्याचा प्रकार चालू होता. निवेदन देऊनसुद्धा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात होते. अधिकाऱ्यांवर कोणताही परिणाम होत नव्हता; परंतु ‘लोकमत’ने शेतकऱ्यांचे दुःख मांडले. त्याची अधिकाऱ्यांनी दखल घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
कोट
वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार वीज दुरुस्तीचे काम सांगूनही शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट केली होती. त्यामुळे पिके वाळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अधिकाऱ्यांनी तातडीने वीजपुरवठा सुरळीत केला.
- सागर कोकीळ,
शेतकरी, धामणेर, ता. कोरेगाव.