अभिजीत ऊर्फ पप्पू लक्ष्मण मोरे (वय २५, रा. तारगाव, ता. कोरेगाव) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपर्डे हवेली गावच्या हद्दीत रेल्वे फाटकाजवळ मंगळवारी दुपारी एकजण पिस्तूल घेऊन विक्री करण्याच्या उद्देशाने वावरत असल्याची माहिती क-हाड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मिळाली. या माहितीनुसार निरीक्षक भरणे यांनी उपनिरीक्षक उदय दळवी, गुन्हे शाखेचे सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे, उत्तम कोळी, शशिकांत घाडगे, अमोल हसबे यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गुन्हे शाखेचे पथक तातडीने त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी रेल्वे फाटक परिसरात पाहणी केली असता एक जण संशयास्पदरीत्या वावरताना त्यांना आढळून आला. पोलिसांनी त्याला हटकले. त्यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला त्वरित ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल व देशी बनावटीचा गावठी कट्टा आढळून आला. तसेच खिशात दोन जिवंत राऊंड आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले. भारतीय शस्त्रास्त्र कायद्यान्वये पोलिसांनी संशयिताला अटक केली असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा, देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत राऊंड असा १ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतची नोंद क-हाड ग्रामीण पोलिसात झाली आहे.
- चौकट
तीन दिवस पोलीस कोठडी
आरोपी अभिजीत ऊर्फ पप्पू मोरे याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याने ती पिस्तूल व गावठी कट्टा कोठून आणला, त्याची विक्री तो कोणाला करणार, किती रुपयांना हा व्यवहार होणार होता, याबाबतचा तपास पोलीस करणार आहेत.
फोटो : १६ केआरडी ०७
कॅप्शन : कोपर्डे हवेली, ता. क-हाड येथे रेल्वे फाटकाजवळ बेकायदा गावठी कट्टा व पिस्तूल बाळगणा-यास क-हाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन अटक केली.