मलकापूर
सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनची आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहा सूर्यकांत जाधव हिने पटियाला पंजाब येथे नुकत्याच झालेल्या २४ व्या राष्ट्रीय फेडरेशन स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. महिलांच्या खुल्या गटात हातोडाफेक क्रीडा प्रकारात ५३.९९ मीटर हातोडाफेक करत राखी गौंडचा १५ वर्षांपूर्वीच्या ५१.८९ मीटर फेकीचा विक्रम मोडत नवीन राज्यस्तरीय विक्रम केला. या यशाच्या जोरावर तिने राष्ट्रीय फेडरेशन स्पर्धेत चतुर्थ स्थानापर्यत मजल मारली.
या यशाबद्दल तिचा व तिचे एन.आय.एस. प्रशिक्षक दिलीप चिंचकर यांचा सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी कराड तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, निरंजन साळुंखे, राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल पाटील, संजय राठोड, खजिनदार अमितराज माने, सचिव योगेश खराडे, राष्ट्रीय खेळाडू संग्राम बाबर, मोहसीन मोमीन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कराड तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, निरंजन साळुंखे, राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल पाटील, संजय राठोड, खजिनदार अमितराज माने, सचिव योगेश खराडे, राष्ट्रीय खेळाडू संग्राम बाबर, मोहसीन मोमीन यांची प्रमुख उपस्थिती होती.
थोरात म्हणाले, स्नेहा जाधवने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे. अंत:करणात मोठे स्वप्न जपाल, तेव्हा आपोआप तुमचा प्रवास त्या स्वप्नांच्या दिशेने होईल. जेव्हा शिष्य तयार असतात तेव्हा गुरू भेटतात. तुम्ही सातत्याने खेळासाठी तयार असले पाहिजे. खेळ व खेळाडूंच्या विकासासाठी सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन नेहमीच प्रयत्नशील राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी खेळाडूंना दिली.
दिलीप चिंचकर यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहा जाधवच्या कामगिरीचा आढावा घेतला. जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने व कराड तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सहकार्याने हा सत्कार समारंभ घेण्यात आला. यासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभले.
चौकट
राष्ट्रीय स्पर्धेत आतापर्यत १६ पदके काबीज
स्नेहा जाधव हिने राष्ट्रीय स्पर्धेत आतापर्यंत १६ पदके जिंकली असून त्यामध्ये २०१६ साली तुर्की येथे झालेल्या मैदानी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना ८ वा क्रमांक, बँकाॅक येथे झालेल्या ज्युनिअर आशियाई स्पर्धेत ६ वा क्रमांक संपादन केला. विशेष म्हणजे २०१६ पासून तिच्या वयोगटात हातोडाफेक या क्रीडा प्रकारात ती महाराष्ट्रात अव्वल स्थानी आहे. ही बाब सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनची खेळाडू म्हणून अभिमानास्पद आहे.