सातारा : साईबाबा मंदिर ते कल्याणी शाळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अनेक निवेदने देऊनही पालिकेकडून ही बाब काही गांभीर्याने घेतली जात नाही. हे खड्डे तातडीने न भरल्यास स्वातंत्र्यदिनी ‘एक खड्डा एक झाड’ हे आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. वैभव मोरे यांनी दिला आहे.
याबाबत पालिका प्रशासन अधिकारी तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, गोडोली व आसपासचा भाग सातारा पालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे येथील मूलभूत समस्या सोडविणे पालिकेला क्रमप्राप्त आहे; परंतुु असे होताना दिसत नाही. साईबाबा मंदिर ते कल्याणी शाळा या मार्गावर सतत वर्दळ असते. महाविद्यालय, शाळा, दवाखाने देखील या मार्गावर आहे. याच मार्गाची खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पावसामुळे या खड्ड्यांची व्याप्ती वाढली असून, अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. या व्यतिरिक्त ठिकठिकाणी सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते. परिणामी डेंग्यूचे रुग्णही आढळून येऊ लागले आहेत.
या समस्यांची तातडीने सोडवणूक न केल्यास स्वातंत्र्यदिनी रस्त्यावरील खड्ड्यांम्ये ‘एक खड्डा एक वृक्ष’ हे आंदोलन केले जाईल. मुख्याधिकारी यांच्याच हस्ते खड्ड्यात वृक्षारोपण केले जाईल,’ असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना अॅड. वैभव मोरे, महारुद्र्र तिकुंडे, जीवन काटकर, प्रशांत नेमाने उपस्थित होते.