..तर लोकसभा सभापती निवडणुकीत आम्हालाही उमेदवार उभा करावा लागेल - पृथ्वीराज चव्हाण
By प्रमोद सुकरे | Published: June 17, 2024 04:00 PM2024-06-17T16:00:33+5:302024-06-17T16:01:39+5:30
साताऱ्यातील पराभवाचे चिंतन सुरू
कराड : लोकसभा सभापती निवडताना सत्ताधार्यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून ठरवला तर आमच्याकडून त्याला पाठिंबा दिला जाईल. आपल्याकडे तशी लोकशाहीत परंपरा चालत आली आहे. पण त्यांनी रेटून काही केले तर आम्हालाही उमेदवार उभा करावा लागेल असे मत काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री ,आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
कराड येथे सोमवारी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर लोकनेते विलासराव पाटील यांच्या नावाच्या स्वागत कमानिचे उद्घाटन चव्हाण यांचे हस्ते झाले. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण माध्यमांशी बोलत होते. यावेळी रयत सहकारी साखर कारखानाचे अध्यक्ष अँड.उदयसिंह पाटील उपस्थित.
नेरेटीव्ह सेट करण्यासाठी एन जी ओ चा वापर केला असा सत्ताधारी विरोधकांवर आरोप करीत आहेत. याबाबत छेडले असता चव्हाण म्हणाले, आम्ही एनजीओ चा वापर लोकशाही वाचवण्यासाठी केला आहे. त्या एनजीओंचे आम्ही आभार मानतो. पण सत्ताधाऱ्यांना त्यात अर्बन नक्षलवादी घुसले असे वाटत असेल तर दोन्ही ठिकाणी तुमचे सरकार आहे तुम्ही त्याची चौकशी करावी असेही ते म्हणाले.
जिकडे जिंकले तिकडे ईव्हीएम चांगले; हरले तिथे सेट झाले म्हणायचे.मग राहुल गांधी निवडून आले आहेत तेथे अविश्वास का दाखवत नाही.असे एकनाथ शिंदे म्हटले आहेत. याबाबत विचारले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ईव्हीएम खराब आहे असा आरोप आम्ही केलेला नाही. पण दक्षिण मुंबईत काहीतरी घडल्याशिवाय गुन्हा दाखल केला आहे का? मग दाखल केलेल्या एफ आर आय ची कॉपी आम्हाला का दिली जात नाही हे शिंदेंनी सांगावे.
राज्यात ओबीसी नेत्यांचे उपोषण सुरू आहे. ५७ लाख बोगस कुणबी नोंदणी रद्द करा. सगे सोयरेंना त्यात घेण्याचा जीआर काढू नका. अशा त्यांच्या मागण्या आहे. शिवाय विधानसभा निवडणुकीला २८८जागा लढण्याचा ठराव त्यांनी त्यांच्या बैठकित केला आहे.याकडे लक्ष वेधले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांचे उपोषण सोडताना नक्की काय आश्वासन दिले होते ते अगोदर जाहीर करावे. कारण मराठा समाजाची फसवणूक केल्याचा काय परिणाम घडला आहे ते आपण पाहातो आहोत.
साताऱ्यातील पराभवाचे चिंतन सुरू
सातारा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा झालेला पराभव आमच्यासाठी धक्कादायक आहे. आम्ही का कमी पडलो याचे चिंतन करीत आहे.कराड तालुक्यात तर आम्ही प्रत्येक पंचायत समिती गणाचा याबाबत आढावा घेत आहोत असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.