ढेबेवाडी येथे १९७९ साली शासनाने शासकीय जागेवर प्लॉटची निर्मिती करून त्या प्लॉटचे वाटप केले. शासनाच्या बेघर योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरे देण्यात आली. या बेघर वस्तीमधील रहिवांशाना ये-जा करण्यासाठी महसूल विभागामार्फत सर्व्हे करून रस्त्याची सोय करण्यात आली. ग्रामपंचायतीमधील नमुना २६ मध्ये या रस्त्याची नोंद असून लांबी ९० मीटर व रुंदी ४.५ मीटर अशी नोंद आहे. या रस्त्याच्या कामासाठी पाटण पंचायत समितीच्या तत्कालीन सभापती वनिता कारंडे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला होता. मात्र, रस्त्याच्या कामासाठी विरोध झाल्याने काम थांबले होते. रस्ता अडविण्यात आल्यामुळे तो निधी परत गेला.
दरम्यान, या रस्त्याबाबत पाटणला प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, निधीअभावी काम रखडले होते. सध्या गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, पुन्हा रस्त्याच्या कामासाठी आडकाठी केली जात असल्याचा आरोप होत आहे. गावाच्या विकासात जर कोणी खो घालण्याचा प्रयत्न करीत असेल तर ग्रामपंचायतीने कारवाई करणे गरजेचे आहे. रस्त्याच्या कामात आडकाठी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
- चौकट
प्लॉट एकाच्या, तर घर दुसऱ्याच्या नावावर?
शासनाच्या बेघर योजनेच्या माध्यमातून ढेबेवाडीत बेघर वस्ती निर्माण झाली. मात्र, ज्यांच्यासाठी ही वस्ती निर्माण झाली तीच कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत का? नसतील तर मग घरांची जागा वाढली कशी, सदर घर हे सातबारा असणाऱ्या मालकांच्याच नावे आहे का, नसेल तर मग प्लॉट एकाच्या नावावर, घर दुसऱ्याच्या नावावर याचे गौडबंगाल काय? याची महसूल विभागाने चौकशी करणे गरजेचे आहे.
- चौकट
गावाच्या विकासाला खीळ
ढेबेवाडीत होणाऱ्या रस्त्याच्या कामास आडकाठी करणे म्हणजे गावच्या विकासाला खीळ घालण्यासारखे आहे. गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. संकुचित विचाराची वृत्ती बदलायला हवी. आपल्या स्वार्थाच्या पलीकडे पाहिले पाहिजे. तरच गावचा सर्वांगीण विकास होऊ शकतो.
फोटो : १७केआरडी०४
कॅप्शन : ढेबेवाडी, ता. पाटण येथील बेघर वस्तीतील रस्त्याचे काम गत अनेक वर्षांपासून रखडले आहे.