सचिन काकडे।सातारा : शहरांमधील गृहनिर्माण सोसायट्या तसेच अपार्टमेंटमधील सोसायटीच्या संचालकांनी रहिवाशांसाठी काही महत्त्वाच्या आचारसंहिता घालून दिल्या आहेत. एका सोसायटीमधून लॉकडाऊनच्या काळामध्ये केवळ एकच व्यक्ती घराबाहेर जाऊन खरेदी करू शकते.
शहरातील पेठा तसेच नगरपालिकेच्या हद्दीबाहेरील गृहनिर्माण सोसायट्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये कोणाचा संसर्ग वाढू नये म्हणून केंद्र तसेच राज्य शासनाच्यावतीने वेळोवेळी वेगवेगळ्या सूचना केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने देखील कुणीही १४ एप्रिलपर्यंत घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी तसेच औषधे घेण्यासाठी जे लोक घराबाहेर पडतात, त्यांनी पुरेसी खबरदारी घ्यावी. तोंडाला रुमाल अथवा मास्क लावावे. खिशामध्ये सॅनिटायझर ठेवावेत तसेच खरेदी केल्यानंतर घरी परतल्यावर प्रत्येकाने साबणाने हात धुवावेत, अशा सूचना वारंवार केल्या जात आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे संशयास्पद नजरेने बघितले जाते. संबंधित व्यक्तींना स्वच्छतेबाबतची योग्य ती काळजी घेतली का, ही चिंताही सोसायटीमधील इतर नागरिकांनाही भेडसावते. या पार्श्वभूमीवर शहर तसेच उपनगरातील सोसायट्यांनी काही आदर्श आचारसंहिता तयार केल्या आहेत. बहुतांश सोसायट्यांमध्ये आदर्श आचारसंहितेबाबतचे फलक दर्शनीस्थळावर लावण्यात आले आहेत तसेच या फलकांवर अध्यात्मिक माहिती, सुविचार लिहून लोकांचे प्रबोधनही केले जात आहे.
घराला कूलूप अन् गेटला कडीसोसायटीमधील नागरिकांनी वारंवार बाहेर पडू नये, यासाठी आचारसंहिता लावण्यात आली असून अनेकांनी आपल्या गावी जाणे पसंद केले आहे. मात्र, जे सोसायटीत राहतात ते दिवसभर स्वत:ला घरामध्येच ठेवतात आणि गेटला कडी लावून गरज असल्यासच बाहेर जाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे कधी न भेटणारी नोकरदार मंडळी सध्या संध्याकाळी आपापल्या गॅलरीत दिसू लागलीय.
अशा आहेत सूचना
- घरातील कोणीतरी एकच व्यक्ती ठरवा जी २१ दिवसांत गरज असेल तेव्हाच बाहेर जाईल.
प्रत्येक वेळी बाहेर जाण्यासाठी फुल्ल भायाचा एकच ड्रेस वापरणे. आल्यानंतर तो धुवून सुकवणे. बाकीच्या कपड्यात मिक्स करू नये.बाहेर जाण्यासाठी एकच पर्स वापरणे. त्यामधीलच नोटा, कॉईन्स आणि कार्डस् वापरावे. हे सर्व दुसऱ्या पर्समध्ये मिक्स करू नये.शॉपिंग बॅगपण प्रत्येक वेळी एकच वापरावी.
- शक्यतो पायी चालत जावे. चारचाकी किंवा दुचाकीची आवश्यकता असेल तर एकच वाहन २१ दिवस वापरावे. चारचाकी किंवा दुचाकी, सायकल, रिक्षा, बस, रेल्वेने प्रवास शक्यतो टाळावा. गर्दी असेल त्याठिकाणी खरेदी करणे टाळा. खरेदी करताना योग्य अंतर ठेवा.
- जिन्याचा वापर करताना आपले हात आजूबाजूला लावू नका. तुमच्या आधी कोणी तरी त्याठिकाणी हात लावलेले असतील.
मोबाईल शक्यतो नेऊ नये. नेलाच तर आल्यावर सॅनिटायझरने पुसून घ्यावा. तसेच आपले हात-पाय चेहरा स्वच्छ धुवून कपडे लगेच बदलावे. हे कपडे स्वतंत्र धुवावे. दुसऱ्या कपड्यात मिक्स करू नये. बाहेर जाण्यासाठी वापरलेले कपडे, शॉपिंग बॅग, पर्स, गाडीची चावी एका बॅगमध्ये ठेवणे.
- सारखे बाहेर जाऊ नये. एकदाच सर्व काही घेऊन येणे.
आपल्या सोसायटीतील सर्वांचे कोरोनापासून आपल्या सर्वांनाच संरक्षण करायचे आहे.संरक्षण त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणे टाळा.आपल्या घरातील लहान मुले, आजारी व्यक्ती व ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांची विशेष काळजी घ्या.