सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे माण तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच सोसायटीच्या ठरावासाठी सचिवाला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पळसावडे येथील शिवाजी रामहरी चव्हाण यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘पळसावडे, देवापूर व हिंगणी येथील शेती विकास संस्थेवर चव्हाण पंधरा वर्षांपासून सचिवपदी कार्यरत आहेत. ते कुटुंबीयांसमवेत पळसावडे येथील इनामवस्तीवर राहतात. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या ठरावाची सोमवारी (दि. १६) देवापूर येथे बैठक होती. सकाळी दहाला देवापूर-पळसावडे विकास सेवा सोसायटी, तर साडेअकराला देवापूर शेती सोसायटीची बैठक बोलाविण्यात आली होती. तत्पूर्वी, सकाळी नऊला आमदार जयकुमार गोरे हे चव्हाण यांच्या घरी आले. देवापूर, पळसावडे व हिंगणी या तिन्ही गावांच्या संस्थेचे ठराव माझ्या बाजूने झाले पाहिजेत. तसे न झाल्यास तुमच्याकडे बघून घेईन, अशी त्यांनी चव्हाण यांना धमकी दिली. तुम्ही व पत्नीही सोसायटीची सदस्य असून तुमचे मतदान आमच्याच पॅनेलला झाले पाहिजे, असे म्हणत जिवे मारण्याचीही धमकी दिली. त्यामुळे घाबरुन देवापूर येथील बैठकीला चव्हाण जाऊ शकले नाही.’ या फिर्यादीवरून म्हसवड पोलिसांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात बेकायदा घरात घुसणे, दमदाटी करणे व धमकी देणे यानुसार भारतीय दंड विधान ४५२, ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शंकर मोरे तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
सोसायटी सचिवाला जयकुमार गोरेंची धमकी
By admin | Published: February 18, 2015 1:03 AM