लोणंद : लोणंदचे नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी, पत्रकार व सामाजिक संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्यांतर्गत राज्यात सलग दोन वर्षे स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम येणाऱ्या कऱ्हाड नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पाला भेट दिली.
लोणंद शहराला गेल्या चार-पाच वर्षांपासून कचऱ्याची समस्या भेडसावत आहे. घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी निधी उपलब्ध असूनही अनेक प्रभागात नागरिकांच्या व नगरसेवकांच्या विरोधामुळे प्रकल्प पूर्ण होण्यात अनेक अडचणी येत होत्या. लोणंदमध्ये सध्या घनकचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काही नागरिकांचा विरोध असतानाही व अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने अखेर लोणंद नगर पंचायतीच्या मालकीच्या गायरान जमिनीवर हा प्रकल्प उभारण्याचे निश्चित झाले आहे.
याठिकाणी काही नागरिकांचा विरोध असल्याने त्यांना विश्वासात घेण्यासाठी व या प्रकल्पामुळे वायू प्रदूषणाचा त्रास नागरिकांना होणार नाही, याची खात्री देण्यासाठी कऱ्हाड नगर परिषदेने राबविलेला घनकचरा प्रकल्प नागरिकांना व नगरसेवकांना दाखविण्यासाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते.
कऱ्हाड नगर परिषदेने अडीच एकरात कचरा प्रकल्प राबविला आहे. हा प्रकल्प कराड शहराच्या मध्यभागी असून, सभोवताली मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असूनही या प्रकल्पाचा शेजारील नागरिकांना कोणताही त्रास होत नाही.
घनकचरा प्रकल्प लोणंद शहरात यशस्वीपणे राबविण्यासाठी व लोकांचा या प्रकल्पाला होणारा विरोध कमी करण्यासाठी लोणंदचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले, नगराध्यक्ष सचिन शेळके, उपनगराध्यक्ष किरण पवार, आरोग्य विभागाचे सभापती लक्ष्मण शेळके, विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे, नगरसेवक व गटनेते हणमंतराव शेळके, पुरुषोत्तम हिंगमिरे, नगरसेविका हेमलता कर्णवर, स्वाती भंडलकर, हर्षवर्धन शेळके, आप्पासाहेब शेळके, रमेश कर्णवर, सुनील यादव, संदीप शेळके, प्राजित परदेशी यांनी कऱ्हाड येथील घनकचरा प्रकल्पाला भेट दिली. यावेळी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर व अभियंता ए. आर. पवार यांनी कऱ्हाड पालिकेच्या घनकचरा व सांडपाणी प्रकल्पाची माहिती दिली.