कऱ्हाड : ‘पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरण प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करा. यातून एकही प्रकल्पग्रस्त शेतकरी वंचित राहू नये, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केल्या.
पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरण प्रकल्पाचे काम सुरू आहे. यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या व प्रश्न कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्याबाबत खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या सूचनेवरून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, भूसंपादन अधिकारी, मोजणी खात्याचे अधिकारी व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘प्रथमतः रेल्वेच्या मूळ हद्दी कायम करण्यात याव्यात. त्याच्या पलीकडे लागणाऱ्या जागेचे सरसकट प्रस्ताव शासनाने तयार करावेत. प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत त्यांना त्याचा योग्य मोबदला नव्या दराप्रमाणे देण्यात यावा. पूर्वी करण्यात आलेल्या जमीन संपादनाबाबत अनेक शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. त्या अगोदर तातडीने सोडवाव्यात. त्यापासून कुठलाही शेतकरी वंचित राहू नये. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरवण्यासाठी रेल्वे लाईन क्रॉस करून पाइपलाइन टाकण्याची व्यवस्था करण्यात यावी. जमिनीचे संपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्या. त्यांचा सातबारा, गावचा नकाशा, महसूल रेकॉर्ड व रेल्वेचे नकाशे याची खातरजमा करावी. संपादित जमिनीत असणाऱ्या उभ्या पिकांचाही मोबदला शेतकऱ्यांना मिळावा. जिल्हाधिकारी व पुणे रेल्वेचे अधिकारी यांच्या स्तरावरील जे-जे प्रश्न सोडविण्यासारखे आहेत ते तत्काळ सोडविले जावेत, अशी सूचना करण्यात आली. शेतकऱ्यांच्या न्याय्यहक्कासाठी धोरणात्मक निर्णयात बदल करावे लागतील, अशा मुद्द्यांविषयी सांगितल्यास त्याचा पाठपुरावा मंत्रालय व दिल्ली स्तरावर करण्यात येईल, असे आश्वासन खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी दिले.
यावेळी सारंग पाटील, भूसंपादन अधिकारी संजय अस्वले, रेल्वे कन्स्ट्रक्शन विभागाचे डेप्युटी चीफ इंजिनिअर सागर चौधरी, योगेंद्र सिंह, जी. श्रीनिवास, कोरेगावच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील, वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, कऱ्हाडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
- चौकट
दहा दिवसांत अहवाल द्या!
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न व मागण्या शेतकरी प्रतिनिधी विकास थोरात व अन्य शेतकऱ्यांनी बैठकीत मांडल्या. त्यांनी केलेल्या मागण्या व सादर केलेले रेकॉर्ड त्याची तपासणी बोरगाव, खराडे, कालगाव व अन्य ठिकाणी जाऊन करावी. संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल दहा दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा, असा आदेश करण्यात आला.
फोटो : 14केआरडी01
कॕप्शन : पुणे-मिरज लोह मार्गबाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.