सातारा : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून गेल्यावर्षी मार्चपासून शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या गाडीवरील चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबाचा चारित्रार्थ चालविण्यासाठी कुणी बसमधून भाज्या, फळे विकतोय तर कुणी कारागीर बनून गाड्यांची दुरुस्ती करत आहे.
जगभर कोरोना गेल्या वर्षापासून थैमान घालत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणेच बदलून गेले आहे. साताऱ्यातील अनेकांकडे दोन-तीन स्कूल बस होत्या. त्यावर भावंडे, वडील, मुलगा चालवत होते. व्यवसाय चांगला चालत असल्याने दुसरी गाडी घेत होते. पण अशातच कोरोनाचा शिरकाव झाला अन् शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आले. साहजिकच मुले घरातच होती. त्यामुळे या व्यवसायावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली.
या गाड्या इतर कारणांसाठी प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवाना नसतो. त्यामुळे त्या दारात उभ्या आहेत. मात्र बॅँकांचे हप्ते थांबलेले नाहीत. बॅँक अधिकारी तगादा लावत असल्याने अनेकजण मिळेल ते काम करुन गुजराण करत आहेत. मात्र त्यांच्यासाठी शासनाने अद्याप कसलेही पॅकेज दिलेले नाही. त्यामुळे आता काय करायचे हा प्रश्न आहे.
१. युनूस मुल्ला, स्कूल बसचालक
रुग्णवाहिकेवर चालक
युनूस मुल्ला यांनी पुढे केलेल्या मदतीच्या हातामुळे डाॅ. युनूस शेख यांनी रुग्णवाहिकेवर चालक म्हणून घेतले आहे. ते केवळ कोरोना रुग्णांची ने-आण करणे हे काम सध्या करत आहेत. अनेकदा कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला उचलण्याचेही ते काम करत आहेत.
२. संजय पिसाळ, विद्यार्थी वाहतूक संघटना
दुचाकी गाड्यांची दुुरुस्ती
घरात दोन गाड्या होत्या. त्या सव्वा वर्षांपासून दारात उभ्या आहेत. त्यामुळे संजय पिसाळ यांच्याकडे काहीच काम नाही. मात्र दुसऱ्या गाडीवर चालक म्हणून काम करत असलेला भाऊ दुचाकी गाड्या दुरुस्त करण्याचे काम करत आहेत. त्यातून चरितार्थ भागवत आहेत.
३. भीमराव कांबळे, स्कूल बसचालक
मिळेल त्या गाडीवर चालक
कोरोनामुळे अकरा लाख रुपये कर्ज बाकी असतानाच गेल्यावर्षी सगळेच बंद झाले. रेशन भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून उपासमारीची वेळ आली. जगण्यासाठी काहीसतरी करावे म्हणून या काळात बदली ड्रायव्हर म्हणून मिळेल त्या गाडीवर जाऊन चार पैसे कमवून रेशनपाणी भरत आहेत.
४. प्रवीण भोसले, स्कूल बसचालक
कामच नसल्याने घरीच
साताऱ्यातील वेगवेगळ्या शाळेतून पन्नास विद्यार्थ्यांची वाहतूक दोन गाड्यांतून केली जात होती. मात्र आता गाड्या जागेवरच आहे. कसलंही काम नाही. अनेक ठिकाणी दुसरा पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला पण लाॅकडाऊन असल्याने कामही मिळत नाही. त्यामुळे अडचणी वाढतच आहेत.
५. कृष्णात शेलार, स्कूल बसचालक
शेतीबरोबरच मजुरीची कामे
शाळाच बंद असल्यामुळे काम नाही. यशिवाय वाहनाचा आरटीओचा कर, इंन्शुरन्स व पासिंगसाठी एका गाडीला किमान ४५ हजार रूपये खर्च आहे. दोन्ही गाड्यांचा ९० हजार खर्च उरावर पडत आहे. रोजिरोटीसाठी शेती व रोजंदारी करण्यशिवाय पर्याय राहिला नाही.
कोण बाधकामावर लागला जाऊ
अनेकांनीच स्कूलबस या बॅँकेतून कर्ज काढून घेतल्या आहेत. त्यामुळे बॅँकांचे हप्ते भरण्याबाबत अधिकारी तगादा लावत आहेत. यातून वाचण्यासाठी शासनाने पॅकेज द्यावे, अशी मागणी भारतीय विद्यार्थी वाहतूक संघटनेकडून केली जात नाही. मात्र अद्याप काहीही मिळालेले नसल्याने काही जण तर बांधकामावर रोजगारीसाठी जात आहेत.