कोपर्डे हवेली : ‘सरपंच परिषद, पुणे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने अखेर गावातील पथदिवे जोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला; पण काही लोक फुकटचे श्रेय घेत आहेत,’ अशी टीका सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष शंकरराव खापे यांनी केली.
सरपंच परिषदेने गावातील पथदिवे सुरू करणे किती आवश्यक आहे, यासाठी निवेदने, वेळोवेळी राज्य सरकारचे मंत्री यांची भेट घेणे या संदर्भाने सतत पाठपुरावा केला होता. यामध्ये मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. मंत्री हसन मुश्रीफ, नितीन राऊत यांना भेटून यातून मार्ग काढण्याची विनंती केली. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना सरपंच परिषदेचे पदाधिकारी भेटले. यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, सांगलीचे जयंत पाटील, बीडचे धनंजय मुंडे, जालनाचे राजेश टोपे, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली. दि. १५ रोजी बैठक घेण्याचे ठरवले; परंतु काही कारणास्तव ती बैठक मंगळवार, दि. २० रोजी झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून सरपंच परिषदेचे पदाधिकारी अध्यक्ष जितेंद्र भोसले, शंकरराव खापे, ज्ञानेश्वर वायाळ, मंदाकिनी सावंत, कोहिनूर सय्यद, भाऊसाहेब भराटे, सुजित हंगरेकर, अमरनाथ गित्ते, सुशील तौर, भद्रिनाथ चिंदे, संदीप देशमुख, प्रदीप झांबरे यांनी परिश्रम घेतले आणि गावातील पथदिव्यांचा निर्णय झाला; पण कोणीतरी न केलेल्या कामाचे श्रेय घेत आहे. कंदील घेऊन लाईट लागत नसते. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागतो. हे आंदोलन सरपंचांनी करायचे नसून, सरकारबरोबर राहून काम करायचे असते. याविषयी निर्णय झाल्यानंतर मागणीचे निवेदन देणे म्हणजे वरातीमागून घोडे, असा प्रसिद्धीसाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे.