सातारा : इंटरनेटमुळे जग लहान झालं आणि मोबाइच्या रूपाने खिशात जाऊन बसलं. कार्यालये ‘पेपरलेस’ होऊन फायलींचे गठ्ठे ‘हार्ड डिस्क’मध्ये सामावले. पण मोठ्यांचं जग असं हळूहळू ‘मायक्रो’ होत असताना लहानग्यांचं दप्तर मात्र अजून गलेलठ्ठच आहे. वीस ते बावीस किलो वजनाचा विद्यार्थी पाठीवर वागवतोय साडेचार ते पाच किलोचं दप्तर. या दप्तरात डोकावलं असता चिमुकल्यांच्या पाठीवर अपेक्षांबरोबरच काही ठिकाणी पालकांचं अज्ञान आणि काही ठिकाणी चक्क दुराग्रहाचंही ओझं जाणवतं. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कसं कमी करता येईल, याविषयी शासनाने एक समिती नेमली असून, पुढील वर्षीपर्यंत या समितीच्या सूचना अमलात येण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर सध्या या चिमुकल्यांच्या पाठीवर किती ओझं आहे, ते कशामुळे आहे, त्याचे आरोग्यावरील परिणाम कोणते, शाळांची भूमिका काय, त्यांनी स्वत: काही उपाय योजले आहेत का, पालकांच्या चुका कोणत्या, याचा सर्वसमावेशक आढावा ‘लोकमत टीम’ने शुक्रवारी घेतला. यासाठी तीन शाळांची निवड करण्यात आली. यात एक इंग्रजी माध्यमाची, एक मराठी माध्यमाची तर एक नगरपालिकेची शाळा निवडण्यात आली. अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय, नगरपालिका शाळा क्र. ७ आणि सातारा इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. प्रत्येक शाळेतील तिसरी आणि चौथीच्या वर्गातील सर्वसामान्य प्रकृतीचा प्रत्येकी एक मुलगा आणि एक मुलगी निवडून त्यांचं आणि त्यांच्या दप्तराचं वजन करण्यात आलं. यावेळी असं दिसून आलं की, तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांचं सरासरी वजन वीस ते साडेबावीस किलोच्या दरम्यान असून, त्यांच्या दप्तराचं सरासरी वजन साडेचार ते सव्वापाच किलोच्या दरम्यान आहे. काही विद्यार्थ्यांचं वजन पंचवीस किलोपर्यंत भरलं. परंतु असे विद्यार्थी तुरळकच आढळले. एकंदरीत प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी स्वत:च्या वजनाच्या वीस ते पंचवीस टक्के (एक पंचमांश ते एक चतुर्थांश) वजनाचं दप्तर पाठीवर वागवतो/ वागवते, असं दिसून आलं. सामान्यत: प्राथमिक शाळांमध्ये दररोज आठ ते नऊ तासिका घेण्यात येतात. दोन शिफ्ट असल्यास नऊ तासिका शक्य होत नाहीत. दररोज दोन ते तीन तासिका कार्यानुभव, व्यवसाय शिक्षण, शारीरिक शिक्षण यांसारख्या विषयांच्या असतात. त्यामुळे सामान्यत: दररोज पाच ते सहा विषयांची पुस्तके आणि आवश्यक वह्या दप्तरात असाव्यात अशी अपेक्षा असते. तथापि, मुलांच्या दप्तरात याहून अधिक वह्या-पुस्तकं आढळतात. याखेरीज कंपासपेटी, इतर साहित्य, टिफिन आणि वॉटरबॅग प्रत्येक मुला-मुलीसोबत दिसते. टिफिन-वॉटरबॅगचं वजन दप्तराव्यतिरिक्त आहे. थोडा विचार, पालक-शाळांमध्ये सुसंवाद, पालकांचं अज्ञान, अवास्तव भीती दूर करणं, शाळेनं दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन असे उपाय योजले गेल्यास शासकीय समितीच्या सूचना येण्यापूर्वीच दप्तराचं वजन काही प्रमाणात का होईना, कमी करणं शक्य आहे, असं दिसून आलं. (लोकमत चमू) न पेलवणारं ओझं... दप्तराच्या ओझ्यानं मुलं सायंकाळी घरी परतल्यानंतर पुरती थकलेली असतात. त्यांच्यातील उत्साह मावळलेला दिसतो. चिमुरड्यांची अवस्था एखाद्या हमालासारखी होते. दप्तराचं ओझं कमी काय म्हणून त्यांना खासगी शिकवण्यांना जुंपलं जातं. सायंकाळी शाळेतून घरी आल्यानंतर फ्रेश होऊन लगेच क्लास गाठावा लागतो. त्याचं दप्तर वेगळंच असतं. एकूणच सध्याचं शिक्षण हे मुलांना ‘न पेलवणारं’ असल्याचं बोललं जात आहे. ‘सॅक’ला बंदी साताऱ्यातील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सॅक आणायला बंदी आहे. या शाळेत पहिलीपासून विद्यार्थ्यांना शाळेचे दप्तर सक्तीचे करण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनुसार सॅकमध्ये सगळी पुस्तके उभी आणि समोर बसतात, त्यामुळे त्याचे पूर्ण ओझे पाठीच्या मणक्यावर येते. याने विद्यार्थ्यांना बालवयातच पाठीचे विकार जडतात. या उलट दप्तरात वह्या पुस्तके आडवी बसतात. दप्तराचे ओझे दोन्ही खांद्यांवर विभागले आणि मणक्यावर ताण येत नाही. ही वैद्यकीय बाब लक्षात घेऊन निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये दप्तर सक्तीचे करण्यात आले आहे. अबब..! अडीच किलोच्या वह्या मुलांच्या दप्तरात दडलंय काय, याची माहिती घेण्यासाठी काही शाळांची‘लोकमत टीम’ने पाहणी केली. यात काही धक्कादायक माहिती पुढे आले. वेळा पत्रकानुसार दप्तर न भरलेल्या चौथीच्या एका विद्यार्थ्याच्या फक्त वह्यांचे वजन होते तब्बल अडीच किलो! अन्य एका विद्यार्थ्याने आणलेल्या पुस्तकांचे वजन अडीच किलो भरले. प्रत्येक विषयासाठी पाठ्यपुस्तक (टेक्स्ट बुक) आणि कार्यपुस्तिका (वर्क बुक) असतं. ज्यावेळी ‘वर्क बुक’ आणायला सांगितलं जातं, तेव्हा ‘टेक्स्ट बुक’ जवळ असणं अपेक्षित नसतं. तरीही पालक दोन्ही पुस्तकं दप्तरात कोंबतात. ज्या विषयाला शंभर पानांची वही करायला शाळेकडून सांगितलं जातं, त्या विषयाला ‘नंतर कटकट नको,’ असं म्हणून पालक दोनशे पानी वही मुलांना देतात. पालकांकडून शाळेचं वेळापत्रक अनेकदा पाहिलं जात नाही. वेळापत्रकानुसार दप्तर भरलं, तर त्याचं वजन कमी होऊ शकेल. अनेक पालक वेळापत्रक न पाहता सर्वच वह्या-पुस्तकं दप्तरात कोंबतात. पाल्याला सोडायला येणारे पालक स्वत: दप्तर उचलतात. अनेक मुलं रिक्षानं येतात. त्यामुळं दप्तराचं वजन हा विषयच गांभीर्यानं घेतला जात नाही.
मुलांच्या खांद्यावर ‘कुणाचे’ ओझे?
By admin | Published: June 21, 2015 10:19 PM