लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील काही रिक्षाचालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारणी केली जात आहे. या मनमानीचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत असून, पैशांवरून रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये खटकेदेखील उडू लागले आहेत.
लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला तसाच रिक्षाचालकांनादेखील बसला. चाके थांबल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला होता. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर रिक्षा पुन्हा धावू लागली. तोवर इंधनाचे दर गगनाला भिडले आणि पुन्हा एकदा रिक्षाचालकांचे कंबरडे मोडले. या संकटातून स्वत:ला सावरण्यासाठी शहरातील काही रिक्षाचालकांनी मनमानी पद्धतीने भाडे आकारणी सुरू केली आहे.
रिक्षा प्रवासासाठी दहा रुपयांच्या जागी वीस रुपये, तर पन्नास रुपयांच्या ऐवजी शंभर रुपये आकारले जात आहेत. काहीजण नवख्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. बऱ्याचदा पैसे देण्यावरून वादविवादही होतात. अखेर शेवटी प्रवाशांनाच नमते घ्यावे लागते. शहरातील काही रिक्षाचालकांच्या मनमानीचा फटका इतर रिक्षाचालक व सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी रिक्षाचालकांनी प्रवास भाडे नियंत्रणात आणणे गरजेचे आहे.
(चौकट)
या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी
बस स्थानक : मध्यवर्ती बसस्थानकात एखादा नवखा प्रवासी दिसला की, इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी त्याला अव्वाच्या सव्वा भाडे सांगितले जाते व आकारले जाते. ‘थोडे पैसे कमी करा’ असे सांगितल्यानंतर काही रिक्षाचालक ‘आम्ही कमीच सांगितलं’ असही उत्तर देतात.
बॉम्बे रेस्टॉरंट चौक : या चौकातून सातारा शहर, संगम माहुली, रेल्वे स्थानक व एमआयडीसीकडे जाणाऱ्या नागरिकांंची संख्या अधिक असते. या ठिकाणीदेखील काही रिक्षाचालकांची मनमानी पाहायला मिळते. केवळ वेळ वाचावा म्हणून प्रवाशांना अधिकचे पैसे द्यावे लागतात.
पोवई नाका : आठ रस्ते एकत्र जोडणाऱ्या पोवई नाक्यावर रिक्षाचालकांची सतत वर्दळ असते. या ठिकाणाहून पूर्वी राजवाड्याला जाण्यासाठी ३० ते ४० रुपये आकारले जायचे. आता साठी ६० ते ७० रुपये आकारले जातात. इतके पैसे का? असं विचारलं तर पेट्रोल महाग झाल्याचे रिक्षाचालक सांगतात.
(कोट)
प्रवाशांना नाहक त्रास
शहरातील काही रिक्षाचालक नियमाप्रमाणे भाडे आकारतात. मात्र, काही जणांकडून प्रवासासाठी जास्त पैसे घेतले जातात. रिक्षाचालकांची कृत्रिम दरवाढ सर्वसामान्यांना न परवडणारी आहे.
- विशाल जगताप, सातारा
(कोट)
महागाई, इंधन दरवाढीचा फटका सर्वांनाच सहन करावा लागत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी जास्त प्रमाणात प्रवासभाडे टाकू नये. भाडे आकारताना सर्वसामान्यांचादेखील विचार करावा.
- नीलिमा पाटील, सातारा
(चौकट)
मनमानी भाडे
- पूर्वी बसस्थानक ते राजवाडा प्रवासासाठी एका व्यक्तीकडून दहा रुपये रिक्षा भाडे घेतले जात होते ते आता वीस रुपये झाले आहे.
- एका व्यक्तिला बसस्थानकावरून बॉम्बे रेस्टॉरंट चौकात जायचे झाल्यास आता पन्नास नव्हे, तर शंभर रुपये मोजावे लागतात.
- काही रिक्षाचालकांकडून दुप्पट प्रवास भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जात आहेत.
(कोट)
रिक्षा चालकांनी नियमाप्रमाणे भाडे आकारणी करावी. चुकीच्या पद्धतीने भाडे आकारणी केल्यास अथवा याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी लागेल.
- विठ्ठल शेलार
सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा