दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : मलवडी, ता. फलटण येथील अनिल नामदेव चव्हाण (वय ४२) यांच्या खुनाचा छडा अवघ्या तीन तासांत लावण्यात फलटण पोलिसांना यश आले. हा खून बापलेकानं केल्याचं उघड झालं असून, पोलिसांनी बापाला अटक केली तर त्याच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनिल चव्हाण हे गुरुवारी (दि. १९) सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे प्रातर्विधीसाठी मलवडी गावच्या हद्दीतील फॉरेस्ट नावच्या शिवारात गेले होते. त्यावेळी अज्ञातांनी धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा निर्घृण खून केला. या प्रकाराची माहिती फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलिसांनी रुग्णालयात पाठविला. मयत अनिल चव्हाण यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तेव्हा अनिल चव्हाण यांचा खून हा महिलांबाबतच्या त्याच्या गैरवर्तणुकीच्या कारणावरून झाल्याची माहिती पोलिसांना समजली.
मृत अनिल चव्हाण यांचा सख्खा मावसभाऊ पोपट खाशाबा मदने हा तो मी नव्हेच, या आविर्भावात घटनास्थळावरील बघ्यांच्या गर्दीमध्ये वावरत होता. तो पोलिसांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होता. परंतु पोलिसांनी बघ्यांच्या गर्दीमधून आरोपी पोपट खाशाबा मदने याच्या हालचाली व देहबोली चाणाक्षपणे हेरून त्याला संशयाच्या आधारे चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने सुरुवातीला तीन तास उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती तो सांगू लागला. परंतु पोलिसांनी प्राप्त परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे त्याच्यावर कौशल्याने प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच त्याला पोलिस खाक्या दाखविताच त्याने त्याच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने अनिल चव्हाण यांचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी पोपट मदने याला अटक केली तर त्याच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ रानगट, सहायक पोलिस निरीक्षक अशोक हुलगे पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे, प्रमोद दीक्षित, अंमलदार संजय अडसूळ, वैभव सूर्यवंशी, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, अमोल पवार, विक्रांत बनकर, हनुमंत दडस, श्रीकांत खरात, विक्रम कुंभार, तुषार नलवडे आदींनी या कारवाईत भाग घेतला.