वडूज : ‘जे मिळते ते नशिबाने; पण त्यासाठी आपण आपले प्रयत्न थांबवता कामा नये. पूर्वी जगण्यासाठी भीक मागताना गाणे म्हणायची त्यातून मिळणाऱ्या पैशातून भूक शमवली जायची. तेव्हा ‘गाणे पे खाना मिलता था,’ अशी माई त्यादिवसांची टर उडवताना ‘अब भाषण पे राशन मिलता है,’ असे प्रतिपादन डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केले.वडूज येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात ड्रीम सोशल फाउंडेशनच्या वतीने खटाव तालुक्यातील शेकडो आदर्श मातांना पुरस्कार वितरणवेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, दादासाहेब गोडसे, अनुराधा देशमुख, सभापती कल्पना मोरे, माजी सभापती संदीप मांडवे, डॉ. शुभांगी काटकर, प्रा. बंडा गोडसे, जिल्हा परिषद सदस्या कल्पना खाडे, तानाजी बागल, बाळासाहेब पोळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.‘आजवर देशातील अनेक राज्यांसह सुमारे २२ परदेश दौरे केल्याचे सूतोवाच करीत आपल्या आयुष्याचा पट समाजासमोर उलगडून मांडताना सर्व श्रोत्यांचे डोळे पाणावले.तर संकट आले तर महिलांनी मागे वळायचं नाही. धैर्याने उभे राहा. मुलींनो संपूर्ण कपडे घाला, तुमच्याकडे पाहिल्यानंतर माय आठवली पाहिजे. सावित्री, जिजाऊ, सिंधुताई नववारीत अन् तुम्ही दोन वारीत, असे चालणार नाही. महाराष्ट्रात माती, नीती अन् संस्कृती हातात हात घेऊन चालते,’ असे भावनिक आवाहन सिंधुताई सपकाळ यांनी केले.दिवंगत पतंगराव कदम यांनी माझ्या असंख्य अनाथ मुलांना आधार दिला. तर प्रभाकर देशमुख जिल्हाधिकारी असताना अनाथ मुलांना घरस्वरुपी आसरा दिला. पुढे माझ्या सामाजिक कार्याने मला अनेक मानसन्मान, पुरस्कार मिळवून दिले. ज्या सासर आणि माहेराने मला दूर लोटले होते, त्यांनीच माझा भव्य जाहीर सत्कार केला.त्या सत्काराला तत्कालीन सात कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. ऐन तारुण्यात ज्या पतीने मला सोडून दिले, त्यांचा मी पुढे सांभाळ केला. सामाजिक कार्यामुळे मला राष्ट्रपतींच्या हस्ते तीनवेळा सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अनुराधा देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. पृथ्वीराज गोडसे यांनी आभार मानले. यावेळी समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, हिंदुराव गोडसे, बाळासाहेब पोळ आदींसह खटाव तालुक्यातील असंख्य आदर्श माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गाणे पे खाना.. भाषण पे राशन मिलता है!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:30 PM