सातारा : पर्जन्यमानाचे द्योतक असणाऱ्या गडद पिवळ्या रंगाच्या बेडकांनी तामजाईनगर भागात दर्शन दिले. मादी बेडकांना साद घालणाऱ्या त्यांच्या डरांव डरांवच्या आवाजाने परिसरात एकच कोलाहल नागरिकांना ऐकायला मिळाला.
पाऊस सुरू झाल्यानंतर अचानकपणे आपणास आजुबाजूस या पिवळ्याधमक नर सोन्या बेडकांचा मादी बेडकांना साद घालणारा डरांव डरांवचा आवाज ऐकू येतो. अक्षरशः झुंबड-झुंडीने हे बेडूक साठलेल्या नाल्या, डबक्यांकडेला दिसून येतात. तामजाईनगरमध्ये या बेडकांनी दर्शन दिले. खरं तर हा त्यानंतर येणाऱ्या चांगल्या पावसाचा किंवा सलगपणे पाऊस चालू राहील याचा निर्देशक मानले जाते. मादी बेडकांनी अंडी दिल्यानंतर त्यातून प्रौढ बेडूक तयार होईपर्यंत निरंतर पाऊस सुरू राहणार, असे मानले जाते.
नर हा मादीपेक्षा लहान असून त्याचा रंग मादीपेक्षा पिवळा आणि गडद असतो. नराच्या खालच्या जबड्याच्या त्वचेमध्ये मागील बाजूस सैल त्वचेच्या पिशव्या असून त्यांना ‘स्वरकोश’ म्हणतात. मादीला मीलन फुगवटे आणि स्वरकोश नसतात. श्वसन संस्थेतील स्वरयंत्र नालामुळे नर मीलनकाळात आवाज काढतात. नरात असलेल्या स्वरकोशामुळे आवाजाचे ध्वनिवर्धन होते. नर मादी बेडकास आकर्षित करण्यासाठी त्याचा वापर करतात व प्रजनन पूर्ण करतात. प्रजनन झाल्यानंतर मादी उथळ डबक्यांमध्ये अंडी घालते, असेही सुनील भोईटे यांनी सांगितले.
चौकट :
सामान्यतः भारत, पाकिस्तान, म्यानमार, बांग्लादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, मालदीव, श्रीलंका या प्रदेशात आढळणारा हा बेडूक इतर बेडकांच्या तुलनेने मोठा, भारी व वजनदार असून त्यावरूनच त्यास इंग्रजीत ''बुलफ्रॉग'' म्हणतात. सोनेरी रंगामुळे मराठीत त्याला सोन्या बेडूक म्हणून ओळखले जाते. गोड्या पाण्याच्या पाणथळ जागा, नद्या, तलाव, ओढे, डबकी यांसारख्या ठिकाणी हा आढळून येतो. परंतु उथळ पाण्याच्या डबक्यांना हा प्राधान्य देतो. त्यामुळे उघडे रानमाळ, नागरी वस्त्यांच्या कडेला साठलेल्या पाण्यात तो सहजासहजी दिसून येतो.
कोट ...
" बेडूक कीटकभक्ष्यी असल्याने उपद्रवी कीटकांची संख्या आटोक्यात राहते. नव्या औषधांची चाचणी घेण्यासाठी वैद्यकशास्त्रात त्यांचा वापर करतात. मात्र प्रदूषण, अधिवास क्षेत्राचा ऱ्हास, इ. कारणांनी बेडकांच्या संख्येत घट झाल्याचे आढळून आले आहे"
- सुनील भोईटे
मानद वन्यजीव रक्षक, सातारा