कोरेगाव : कोरेगावात बांधकाम सुरू असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे लवकरच विस्तारीकरण केले जाणार आहे. वन विभाग वगळता, सर्वच कार्यालये या इमारतीतून कामकाज करतील. त्याचबरोबर पाचशे जण बसू शकतील, एवढे मोठे सभागृह तिसऱ्या मजल्यावर उभारण्यात येणार आहे. बांधकामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
मॅफको कंपनीच्या जागेत उभारण्यात येत असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कामाची सोमवारी सकाळी आ. शिंदे यांनी पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दिग्विजय वंजारी, बांधकाम पर्यवेक्षक मनोज फडतरे यांनी आराखड्याची माहिती दिली.
इमारतीचे दोन मजले वाढविले जाणार असून, अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी व्यवस्था केली जात असून, अंतर्गत रस्त्यांसाठी निधी मंजूर केला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत दर्जेदार व टिकावू काम झाले पाहिजे, तालुक्यातून येणाऱ्या लोकांना त्रास होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अभियंत्यांना दिल्या.
मॅफको कंपनीच्या पिछाडीस असलेल्या शेतकऱ्यांनी आ. शिंदे यांची भेट घेऊन, शेतात जाण्यासाठी रस्त्याची अडचण येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याची पाहणीसुद्धा आ. शिंदे यांनी केली. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, उपजिल्हा रुग्णालय सल्लागार समितीचे सदस्य डॉ. गणेश होळ, सिद्धार्थ बर्गे, अमरसिंह बर्गे, सागर दळवी, प्रशांत गायकवाड, गणेश धनावडे, तुषार चव्हाण, महादेव जाधव, चंद्रकांत बर्गे, प्रशांत पवार, विजय देशमुख, मनोज बर्गे, नरेश गायकवाड, किरण देशमुख, संदीप खिरे आदी या वेळी उपस्थित होते.
फोटो : १२ कोरेगाव प्रशासकीय इमारत
कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची आमदार शशिकांत शिंदे, राजाभाऊ जगदाळे, सिद्धार्थ बर्गे, डॉ. गणेश होळ, अमरसिंह बर्गे यांनी पाहणी केली. (छाया : साहिल शहा)