कऱ्हाड / इस्लामपूर : कारखाना कार्यक्षेत्रात सातत्याने ऊस पीक घेतले गेल्याने, अति पाण्याच्या वापराने जमिनी क्षारपड झाल्या आहेत. जमिनीचा पोत सुधारून शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढावे, यासाठी आपण सत्तेवर येताच कारखाना कार्यक्षेत्रात क्षारपड जमीन सुधारणेचा कार्यकम हाती घेणार असल्याची घोषणा कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केली.
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे झालेल्या संस्थापक पॅनेलच्या जाहीर प्रचार सभेत अविनाश मोहिते बोलत होते. यावेळी माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील, जयवंत जगताप, अजित पाटील, बाबासाहेब पाटील, माणिकराव मोरे, महेश पवार, भरत कदम, सुभाष शिंदे, डॉ. जयकर शिंदे, सुधीर रोकडे, गजानन पाटील, दिनकर सावंत, सुरेश पाटील, ॲड. माणिकराव कुलकर्णी, अमोल पाटील, बाजीराव रसाळ, पंडित माळी, आनंदराव जगताप, जयवंतराव मोरे, धनाजी साळुंखे, मधुकर डिसले, गोरख पाटील, बाजीराव रसाळ, पोपटराव कदम, सुभाष शिंदे उपस्थित होते.
मोहिते म्हणाले, क्षारपड जमीन सुधारणेच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या पडिक जमिनी हाताखाली येणार असल्याने जमिनीचा पोत सुधारून एकरी टनेजचे उत्पादन वाढणार आहे. त्याचा फायदा कृष्णेच्या सभासदांना होऊन त्यांच्या आर्थिक परिस्थितीत झपाट्याने बदल होईल. एकरी किमान शंभर टन उत्पादन निघावे, यासाठी ठिबक सिंचनचा वापर करून सुधारित शेतीसाठी शेतकऱ्यांना पाठबळ दिले जाईल. त्याकरिता आपण मास्टर प्लॅन तयार केला आहे. पहिल्याच बैठकीमध्ये आठ हजार मयत सभासदांचे शेअर्स त्यांच्या नावे करणार असल्याचेही मोहिते यांनी स्पष्ट केले.
यावर्षी भोसले यांनी कृष्णेची एम प्रतीची साखर प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांचे टेंडर काढून विकली आणि जयवंतची साखर ३,१५० रुपयांनी विकली. कृष्णेच्या बारा लाख क्विंटल साखरेची प्रतिक्विंटल दीडशे रुपये याप्रमाणे होणाऱ्या फरकाची १८ कोटीची रक्कम डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या घशात घातली असल्याचा आरोप मोहिते यांनी यावेळी केला.