पेट्री : सातारा - बामणोली रस्त्यावर असलेल्या पुलाची उंची कमी असून, दोन्ही बाजूला संरक्षक कठडे नसल्याने पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. परिसरात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. बुधवारी पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प झाली आहे. दरवर्षी तलाव ओव्हरफ्लो झाल्यावर अतिवृष्टीमुळे बऱ्याचवेळा पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत होते. कित्येक वर्षांपासून ग्रामस्थांना या समस्येला सामोरे जावे लागत असून, बुधवारी सायंकाळपासून पूल पाण्याखाली गेल्याने १०५ गावे संपर्कहीन झाली आहेत.
तलावाच्या दक्षिणेला धोकादायक वळणावरील पुलाच्या दक्षिणोत्तर बाजूला रक्षक दगड असून, दोन्ही बाजूला संरक्षक कठड्यांचा अभाव आहे. पुलाची उंची चार-पाच फूट असल्याने कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मोठ्या पावसात दरवर्षी पुलावरून तीन-चार फुटांवरून पाणी वेगाने वाहते. ३५ ते ४० फूट लांबीपर्यंत पूल पाण्याखाली जातो. अरूंद रस्त्याचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणची धोकादायक परिस्थिती पाहता, पुलावरून पाणी वाहताना दळणवळण, वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो.
यंदा जून महिन्यात कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला. काही दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा मुसळधार बरसण्यास सुरुवात केली. या पावसामुळे बुधवारी कास पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून वाहतूक ठप्प झाली. या भागात अतिवृष्टी झाल्यामुळे व कास तलावाच्या दक्षिणेकडील पुलाची उंची कमी असल्याने मुसळधार पावसात कास तलाव पूर्णपणे वाहू लागला की, हा पूल पाण्याखाली दिसेनासा होऊन वाहतूक ठप्प होते. या मार्गावरून जाणाऱ्यांची गैरसोय होऊन नोकरदारवर्गाची तारांबळ उडते.
कासच्या पुलावरून पाणी वाहताच पलीकडील वाहने पलीकडे, अलीकडील वाहने अलीकडे अडकून पडतात. अनेकदा पश्चिम भागातील गावांचा संपर्क तुटतो. पूल पाण्याखाली गेल्यानंतर पावसाचा जोर कमी होऊन पाणी कमी होण्यासाठी तीन-चार तास थांबावे लागल्याने वाहतूक ठप्प होते. पावसाचा जोर कायम असल्याने तसेच पाईपमध्ये गाळ, लाकडं अडकून पडल्याने बुधवारपासून पुलावरून पाणी वाहू लागले आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास भविष्यातील दुर्दैवी प्रसंग टाळले जातील.
चौकट
पूल पाण्याखाली जाताच पाण्याचा वेग प्रचंड असतो.
रक्षक दगडावरून पाणी वाहताना पूल ओलांडू नये, असा दर्शनी फलक पूर्णतः गंजला असून, नवीन फलक बसविणे आवश्यक आहे. पुलाची उंची वाढविण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ, नोकरदारवर्ग, वाहनचालंकाकडून होत आहे. प्रशासनाने लोकांच्या गैरसोयीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कोट
बऱ्याचदा हुल्लडबाजी, स्टंटबाजी करणारे बेभरवशावर प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून वाहने पलीकडे नेण्याचा प्रयत्न करतात. यातून मोठ्या अपघाताची शक्यता आहे. तातडीने वैदयकीय सेवा भासल्यास वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी तत्काळ उपाययोजना होणे आवश्यक आहे.
- विष्णू किर्दत, माजी अध्यक्ष, कास संयुक्त व्यवस्थापन समिती
काल सायंकाळपासून सद्यस्थितीत पुलावरून अद्याप पाणी वाहत आहे. (छाया - सागर चव्हाण )