सातारा : अवैध व्यवसायावर पोलीस रेड टाकायला गेल्यानंतर अनेकदा पोलिसांना घटनास्थळीच अवैध ऐवज सापडत असताे. मात्र, असा ऐवज सापडू नये म्हणून संशयितांकडून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातात. असाच काहीसा प्रयत्न साताऱ्यात घडला असून, जुगार अड्ड्यावर पोलीस रेड टाकायला गेल्यानंतर चाैथ्या मजल्यावरील खिडकीतून चक्क नोटांचे बंडल खाली फेकले गेले. खिडकीतून पैशांचा पाऊस पडत असल्याचे पाहून आजूबाजूच्या रहिवाशांची चंगळच झाली. कोणाच्या हाती दोन हजार तर कोणाच्या हाती पाचशे रुपयांचे बंडल लागले.
साताऱ्यातील करंजे पेठेतील यशवंत हाॅस्पिटलजवळ असणाऱ्या वरदविनायक अपार्टमेंटच्या चाैथ्या मजल्यावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी एक पथक तयार करून मंगळवारी सायंकाळी कारवाईसाठी पाठविले. इमारतीची पुढील बाजू सीसीटीव्हीने अक्षरश: झाकली होती. त्यामुळे पोलीस आल्याची कानकून साहजिकच चाैथ्या मजल्यावर जुगार खेळत असलेल्यांना लागली. काही पोलीस लिफ्टने, तर काही जीना चढून वर गेले. त्यामुळे कोणालाच पळता आले नाही. आपल्याजवळील रक्कम सापडली तर आपण यात गुंतले जाऊ, अशी भीती वाटल्याने अनेकांनी टेबलावर असलेले पैशांचे बंडल इमारतीच्या पाठीमागील खिडकीतून खाली फेकले. हे पाहून नागरिकांनी धाव घेत पैशांचे बंडल खिशात घातले. एकाच वेळी खिडकीतून पाऊस पडल्यासारखे पैसे खाली पडत होते. त्यामुळे हे दृश्य पाहणाऱ्या नागरिकांना पैसे खिशात घालण्याचा मोह आवरला नाही. खाली फेेकण्यात आलेली रक्कम लाखात असल्याचे बोलले जात आहे.
चाैकट : अड्ड्यावरील बाज डोळे दिपणारा...
या जुगार अड्ड्यावरील उलाढाल पाहून पोलिसांचे डोळे विस्फारले. टेबलावर पत्त्ये पिसण्यासाठी नेमणूक केलेल्या व्यक्तीला ‘जॅकी’ असे म्हटले जाते. असे जॅकी या ठिकाणी म्हणे पाच ते सहा होते. या जॅकींना खाऊन पिऊन ७०० रुपये हजेरी दिली जात होती. एवढेच नव्हे तर जुगार खेळणाऱ्यांना जेवण व नाष्टा देणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना ५०० रुपये हजेरी होती. यावरून या जुगार अड्ड्यावरील बाज कसा असेल, हे दिसून येते.
चाैकट : खेळून थकल्यानंतर मालिश..
या अड्ड्यावर म्हणे अंगाचे मालिश करणाराही असायचा. जुगार खेळून थकल्यानंतर तो जुगाऱ्यांचे मालिश करायचा. या बदल्यात तो एका व्यक्तीकडून एक हजार रुपये घ्यायचा. अशा प्रकारची जुगाऱ्यांची उठाठेव या अड्ड्यावर सुरू होती.
चाैकट : पुण्यातील घटनेला उजाळा...
आयकर विभागाचे अधिकारी एका अधिकाऱ्याच्या घरात रेड टाकायला गेल्यानंतर असाच प्रकार पुण्यात घडला होता. अधिकाऱ्याच्या पत्नीने शाैचालयाच्या खिडकीतून खाली पैशांचे बंडल फेकले होते. त्यावेळी हे पैसे उचलण्यासाठी आजूबाजूंच्या रहिवाशांची अक्षरश: शर्यत लागली होती. असाच प्रकार साताऱ्यात घडल्याने पुण्यातील त्या घटनेला यानिमित्ताने उजाळाला मिळाला.