रहिमतपूर : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व प्रतिसरकारमधील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर गटाचे प्रमुख सोपानराव कुंडलिक घोरपडे (आप्पा) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. घोरपडे यांच्या निधनाने प्रतिसरकारच्या चळवळीतील सातारा जिल्ह्यातील अखेरचा दुवा निखळला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, नात, नातू, नात सून व त्यांची मुले असा परिवार आहे.क्रांतिसिंह नाना पाटील यांचा वारसा सांगणाऱ्या सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचे स्वातंत्र्य सैनिक म्हणून सोपानराव घोरपडे यांना ओळखले जात होते. सोपानराव घोरपडे यांचा जन्म १५ मे १९२० रोजी रहिमतपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले.
१९६५ मध्ये प्रभात फेऱ्यांत सहभागी होऊन सोपानराव घोरपडे यांनी स्वातंत्र्य लढ्यास सुरुवात केली. १९३६ ते १९३८ या कालावधीत विद्यार्थी संघटनेचा तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.
इंग्लंडचे सहावे जॉर्ज गादीवर बसले तेव्हा रहिमतपूर येथील विद्यार्थ्यांना खाऊ व बिल्ले वाटप केले होते. परंतु विद्यार्थी संघटनेने खाऊ व बिल्ले फेकून देत निषेध केला. १९३९ मध्ये कोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व १९४० मध्ये कोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद सोपानराव घोरपडे यांनी भूषवले आहे.त्यावेळी सुरू झालेल्या जागतिक युद्धावेळी ब्रिटिश सरकारने घेतलेल्या देशविरोधी निर्णयाविरुद्ध प्रचार केल्याबद्दल सोपानराव घोरपडे यांना तीन वर्षे तीन महिन्यांची शिक्षा झाली. ब्रिटिश सरकारने कितीही त्रास दिला तरी देशहितासाठी लढण्याचे काम घोरपडे आप्पांनी कायम सुरू ठेवले.
रहिमतपूर येथे झालेल्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोपानराव घोरपडे यांच्या कामाचे कौतुक केले होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनामध्ये पुसेगाव येथे शासकीय इमारत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून सोपानराव घोरपडे यांना एक वर्ष स्थानबद्ध म्हणून कारावास भोगावा लागला. त्यानंतर ब्रिटिश सरकारने घोरपडे आप्पा यांच्यावर अटक वॉरंट काढले.
यावेळी आप्पांनी भूमिगत होवून सुमारे ७५ लोकांचा गट तयार केला. या गटाच्या माध्यमातून जनतेला त्रास देणाऱ्या गुंडांना शिक्षा देण्याची कामे केली. तसेच गावोगावचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली.
या कालावधीतच भूमिगतांना अटक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पोलसि बंदोबस्त वाढविण्यात आला. त्यामुळे सोपानराव घोरपडे मुंबईला गेले. मुंबई येथे राष्ट्र सेवा दल, हिंदी वर्ग व साक्षरता प्रसार यासारखी कामे केली. स्वातंत्र्य संग्रामात सोपानराव घोरपडे यांनी मोठे योगदान दिले.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सातारा जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष म्हणून १९५० ते १९५२ या कालावधीत त्यांनी काम पाहिले. रहिमतपूर नगरपरिषद व विविध सहकारी संस्थांतील महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केले.
जिल्हा स्वातंत्र्यसैनिक गौरव समिती व जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ९ आॅगस्ट २००७ रोजी त्यांचा दिल्लीत तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.सोपानराव घोरपडे यांच्यावर ब्रह्मपुरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.