वरकुटे-मलवडी : दुष्काळी माण तालुक्यात तब्बल सहा वर्षांनंतर यंदाच चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे ज्वारीला चांगलाच बहर आला आहे. यामुळे पिकांंमुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. साहजिकच हुरडा खाण्यासाठी पाहुणे मंडळी, मित्र कंपनीला बोलावले जात आहे.
यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या दमदार पावसाने माण तालुक्यातील पाण्याची पातळी वाढ झाली. यामुळे माण तालुक्यातील रबी पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे गहू, हरभरा, मका आदी पिके जोमात आली आहेत. माळरानावर हुरडा पार्ट्या रंगात येऊ लागल्या आहेत.
मागील सहा ते सात वर्षांच्या तुलनेत यंदा भूगर्भात पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे तलाव, विहिरी भरलेल्या आहेत.
काही ठिकाणच्या ओढ्या-नाल्यांतून अजूनही पाणी खळाळत आहे. एकंदरीतच अनुकूल आणि पोषक वातावरणामुळे माण तालुक्याच्या पूर्वेकडील वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, शेनवडी, कुरणेवाडी, जांभुळणी, वळई, पानवन, शिरताव, देवापूर आदी गावांमध्ये शेतकऱ्यांनी रबी हंगामात ज्वारी पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे. पीक वाढीसाठी यंदा हवामानही अनुकूल असल्याने सध्या ज्वारीसह रबी हंगामातील इतर पिकांची वाढ ही जोमात झाली आहे. सध्या ज्वारीचे पीक निसवून टपोर कणसे बाहेर पडू लागल्याने टचटचीत हुरडा भरलेल्या कणसांचे दाणे खाण्यासाठी बहरलेल्या पिकात पाखरांचा किलबिलाट वाढत चालला आहे. कणसाने बहरलेल्या शेताची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची शक्कल लढवावी लागत आहे. अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. मात्र, मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत तर शेतीमालाला बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. यंदा पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे ज्वारीसह गहू, हरभरा ही पिके हिरवीगार व जोमदार असून हरभराही फुलोऱ्यात आला आहे, तर ज्वारी हुरड्याला आली आहेे.
फोटो
१३वरकुटे-मलवडी
वरकुटे-मलवडी येथील शेतात ज्वारीचे पीक जोमात आले आहे. (छाया : सिद्धार्थ सरतापे)