पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक व व परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास झालेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऐनवेळी पडलेल्या पावसामुळे वाढीच्या अवस्थेत असलेले ज्वारीचे पीक भुईसपाट झाले आहे. त्याचबरोबर इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
गेले काही दिवस वातावरणात अधून-मधून निर्माण होणाऱ्या ढग व पाऊससदृश वातावरणीय परिस्थितीनंतर पिंपोडे बुद्रुक व परिसरात गुरुवार, दि. ७ रोजी दुपारच्या सुमारास अर्धा तास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. परिसरात ऐनवेळी झालेल्या पावसामुळे वाढीच्या अवस्थेत असलेले ज्वारीचे पीक भुईसपाट झाले. त्याचबरोबर तोडणी अवस्थेत असलेली स्ट्रॉबेरी, यासह द्राक्ष, डाळिंब फळबागांचेदेखील मोठे नुकसान झाले.
दरम्यान, गेले काही दिवस सततच्या बदलणाऱ्या वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक खर्च करावा लागला असताना, आता अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी खचून गेला आहे.
(कोट..)
ऐनवेळीच्या पावसामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा अहवाल शासनास सादर करणार आहोत. तथापी, संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेस प्राधान्य देण्याची गरज आहे.
-गुरुदत्त काळे ,
जिल्हा कृषी अधीक्षक, सातारा
(कोट...)
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीत ज्वारी, स्ट्रॉबेरी, द्राक्षे व इतर शेती पिकांचे पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच वातावरणातील बदल व अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या आर्थिक मदतीची गरज आहे.
-अमोल धुमाळ,
युवा शेतकरी
०८पिंपोडे बुद्रुक
-फोटो- सोनके (ता. कोरेगाव) परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारीचे पीक भुईसपाट झाले आहे. (छाया : संतोष धुमाळ)