लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : काही वर्षांपूर्वीपर्यंत ज्वारी हे गरिबांचे धान्य होते. गहू हा सणालाच वापरला जात होता तर शहरात चपातीला स्थान होते. पण, आरोग्याच्यादृष्टीने ज्वारीचे महत्त्व वाढले आहे. त्यातच गव्हाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे गव्हाचा दर कमी झाला आहे. त्यामुळे गव्हापेक्षा ज्वारीची श्रीमंती अधिक वाढली असल्याने शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे.
लोकांकडून आहारात प्रामुख्याने बाजरी, ज्वारी, गहू या धान्याचा अधिक उपयोग करण्यात येतो. काही प्रमाणात नाचणी, मका यांचाही वापर केला जातो. ३० वर्षांपूर्वी ज्वारीला आहारात अधिक स्थान होते तर गहू सणाला व पाहुणे मंडळी आली की वापरला जाता होता. पण, गेल्या काही वर्षांत ज्वारीपेक्षा गव्हाचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे गव्हाचा दर कमी झाला आहे. त्यातच डॉक्टरही ज्वारी आरोग्यासाठी चांगली असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे गव्हापेक्षा ज्वारीला आहारात प्राधान्य मिळत चालले आहे. भाकरी रोज खाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. तर चपाती खाणारे नागरिक शहरी भागात अधिक आहेत.
गेल्या काही वर्षांत ज्वारीचे उत्पादन कमी होत आहे तर गव्हामध्ये संकरित वाण आले आहेत. यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे गव्हाचा दर कमी होत आहे तर ज्वारी महागच होत चालली आहे. यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ लागले आहेत.
...................
अशी वाढली ज्वारीची श्रीमंती (प्रति क्विंटल दर)
ज्वारी गहू
१९८० ९०० १०००
१९९० १२०० १४००
२००० १८०० २०००
२०१० २५०० २२००
२०२० ३००० २८००
२०२१ ३६०० ३०००
......................................................
आपल्या आरोग्याची श्रीमंती ज्वारीतच...
१. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरिराला पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमधून शरिराला मुबलक प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. तसेच ज्वारीच्या भाकरीमुळे अन्नाचे सहज पचन होते.
२. ग्रामीण भागात आजही ज्वारीचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे कदाचित शहरीपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी कमी असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच ज्वारी फायदेशीर ठरत आहे.
३. ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात तंतूमय पदार्थ असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. ज्यांना अॅसिडिटीचा त्रास होतो, त्यांनी चपातीऐवजी आहारात ज्वारीचा समावेश करावा, असे सांगण्यात येते.
...............................................................
जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन टिकून...
सातारा जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात ज्वारीचे उत्पादन घेण्यात येते. खरीपमध्ये सातारा, जावळी, कऱ्हाड, वाई, पाटण या तालुक्यांत ज्वारीचे पीक घेतले जाते. तर पूर्व भागात माण, खटाव आणि फलटण तालुक्यात रब्बीत ज्वारीचे पीक घेण्यात येते. माण, खटाव तालुक्यांमधील वातावरण ज्वारीसाठी पोषक असते. त्यामुळे बहुतांशी शेतकरी ज्वारीचे पीक घेतात. तसेच गहूही काही प्रमाणात करतात. जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र व उत्पादन टिकून असल्याचे दिसून येत आहे.
.............................................
भाकरी परवडायची म्हणून खायचो...
आमच्या काळात गव्ह कमी व्हायचा. त्यातच शेतात जुंधळा केला जायचा. गव्हाला दर असल्यामुळे परवडणारा जुंधळा घरात असायचा. त्यामुळे जेवणात जोंधळा भाकरीला महत्त्व असायचं. आताही तीच खातू.
- बाबासाहेब आटपाडकर
..............................
३० वर्षांपूर्वी बाजरी आणि ज्वारी हेच प्रमुख पीक आम्ही घ्यायचो. त्यातून ज्वारीची भाकरी वर्षभर खात होतो. चपाती सण, पाहुणे आले की करत होतो. पण, आता गहू स्वस्त झाला असला तरी सवयीमुळे ज्वारीची भाकरीच खातो.
- सुरेश हांगे
......................................................
चपाती आवडीने खातो...
जेवणात ज्वारी, बाजरीची भाकरी असते. तसेच चपाती खाण्याचे प्रमाणही वाढले आहे. सवय असल्याने चपातीलाच अधिक प्राधान्य असते. दररोज एकवेळ तरी चपाती आवडीने खाल्ली जाते.
- संजय चव्हाण
.........................
शहरी भागातील जेवणात अजूनही चपातीचे स्थान टिकून आहे. मुलांना आणि आम्हालाही चपाती आवडते. त्यामुळे कधीतरी ज्वारी आणि बाजरीची भाकरी खातो.
- बाळासाहेब लंगुटे
.................................................................