सातारा : दुचाकीवरून जात असताना वाटेत उभ्या असलेल्या गाडीला हॉर्न वाजविला म्हणून युवकाचा चक्क गळा आवळल्याची घटना लिंब, ता. सातारा येथे घडली. याप्रकरणी सहाजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संदेश ज्ञानदेव सावंत, संकेत ज्ञानदेव सावंत, रोहित वाघमळे, प्रतिक यादव, तुषार सावंत (लाल्या) (सर्व रा. लिंब, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आदित्य प्रकाश निकम (वय १७, रा. लिंब, ता. सातारा) हा रविवार दि. ७ रोजी दुपारी तीन वाजता गावच्या यात्रेतील जेवणाचे निमंत्रण देण्यासाठी दुचाकीवरून मित्रांकडे निघाला होता. मधल्या आळीने लिंब फाट्याकडे जात असताना वाटेत थांबलेल्या चारचाकी वाहनास पाहून आदित्यने हॉर्न वाजविला.
त्यामुळे चिडून जाऊन वरील संशयितांनी आदित्यला लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्याचा गळाही आवळून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर आदित्यने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. याची तत्काळ दखल घेऊन पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले.
आरटीओ कार्यालयातून एलईडी चोरीस
सातारा : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ३५ हजारांचा एलईडी टीव्ही अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली.याबाबत आरटीओ कार्यालयाील कर्मचारी सुदर्शन गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील लर्निंग लायसन्स विभागामध्ये एलईडी लावण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास कार्यालयात प्रवेश करून हा एलईडी चोरून नेला. शासकीय कार्यालयातच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.