हा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी आलेला असतो. प्रत्येकजण त्याच्याकडे वेगवेगळ्या नजरेने पाहतो. मंदिरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे गाभारा. मुख्य देवतेच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात जायचे असेल तर छोट्या दरवाजातून मान वाकवून आत जावे लागते. तेथेच आपल्यातील अहंकार, ‘मी’ पण गळून पडते अन् आपण देवाच्या जवळ गेल्याचा अनुभव येतो, असे काहींचे म्हणणे आहे.
हे त्यांच्या विचारातून खरेही असेल. पण त्याला विज्ञानाचाही आधार आहे. आपल्याकडील शिवालयांमध्ये शिवलिंग असलेला गाभारा छोटा असतो अन् आत पायऱ्या उतरुन जावे लागते. त्यामुळे आतील वातावरण थंड असते. तसेच मंदिराचा मुख्य कळस हा गाभाऱ्यावर असतो. छोट्या जागेच्या मधोमध उंचच उंच शिखर आणि कळस असतो. त्याची रचना आतील बाजूस मोकळी असते. गाभाऱ्याच्या केंद्रस्थानी मूर्ती आणि त्याच्या शेजारी आपण बसलेलो असतो. त्यामुळे एकप्रकारची सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. तेथे बसल्यानंतर आपल्याला शांती मिळते आणि मंदिरातील घंटा वाजल्यानंतर मन आणखीन आनंदीत होते.
या वास्तूकलेचा मन:शांती, ध्यान, साधना केंद्रांमध्ये वापर केलेला असतो. अशाठिकाणी ध्यान करताना कसलाही अडथळा येऊ नये, मन:शांती मिळावी यासाठी छोट्या-छोट्या खोल्या बांधलेल्या असतात. त्यामध्ये एकावेळी एकच व्यक्ती बसू शकते. त्यावरही शिखर आणि कळस बसवलेला असतो.
कोट :
प्रपंचातील संकटे, अडीअडचणी यातून क्षणभर का होईना मनाला आनंद देणारी असते. कुणीतरी माझ्या पाठीशी आहे, अशी भावना निर्माण करणारी आपली मंदिर संस्कृती आहे. आनंद, समाधानासाठी, मंदिरातील गाभाऱ्याची अनुभूती नक्की घ्यायला हवी.
- महेश स्वामी, सातारा
चौकट :
बाहेर रखरखतं ऊन अन्...
ऊन्हाळ्यात रखरखत्या ऊन्हातून कित्येक किलोमीटरचा प्रवास केल्यामुळे आपण त्रासून जातो. पण अशाच एखाद्या मंदिरात जाऊन काही क्षण गाभाऱ्यात बसलो तर बाहेरचं सारं विसरून जातो. हे केवळ अप्रतिम वास्तू कलेमुळेच शक्य आहे. याचा अनुभव अनेकदा घेतला आहे, अशा भावना प्रशांत नागुरे यांनी व्यक्त केल्या.