वडूज : खटाव तालुक्यातील ठरावीक भागात समाधानकारक तर उर्वरित ठिकाणी पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे सध्या काही ठिकाणी पेरणी झाली असून बहुतांशी भागात रखडली आहे. तालुक्यात आतापर्यंत फक्त १६ टक्केच पेरणी पूर्ण झालेली आहे.
खटाव तालुक्यात खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. त्यासाठी पाऊस पुरेसा आवश्यक असतो. अपुऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे खटाव तालुक्यातील प्रत्येक गावातील काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. त्यातच तालुक्यातील बुध परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने पेरणी केलेल्या शेतातील बियाणे जमिनीत खोलवर गडप झाले. त्यानंतर पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्याने तालुक्यातील तुरळक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे तर तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांची पेरणी फसली आहे.
नैसर्गिक संकटाशी सामना करण्यासाठी स्वत:ला धीर देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी चालवली आहे.
दरम्यान, खटाव तालुक्यात आतापर्यंत सरासरी ११२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. वडूज येथे १०२.५ मिलीमीटर, खटाव १११, पुसेगाव १०५, पुसेसावळी ९१, औंध ९८, निमसोड ९०, कातरखटाव १०७, मायणी ७२ आणि बुध मंडलात २३१ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. सध्या जमिनीतील ओलावा संपल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत येथील बळिराजा आहे.
चौकट :
पीकनिहाय पेरणी हेक्टरमध्ये...
खरीप ज्वारीची १६ हेक्टरवर पेरणी झाली आहे तर बाजरी १८९०, मका ११३०, तूर २, उडिद ३३१.५, मूग ४३९.३, इतर कडधान्ये २२.४ हेक्टर, भुईमूग ४५ तर सोयाबीनची १३६० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे तालुक्यात सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचे ४४६४० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ६९२१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.