सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस चांगला झाला असला तरी पूर्वेकडे अजूनही समाधानकारक नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी रडतखडत सुरू असून, जूनअखेरपर्यंत ६७ टक्के पूर्ण झाली आहे. यामध्ये सोयाबीनची सर्वाधिक ९४ टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीनचा ६० हजार हेक्टवर पेरा आहे. तर भातलागण ५६ आणि बाजरीची पेरणी ५१ टक्के झाली आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा असतो. या हंगामातील जिल्ह्याचे ऊस वगळून सर्वसाधारण क्षेत्र हे ३ लाख १६ हजार ७०१ हेक्टर आहे. यामध्ये बाजरीचे सर्वाधिक ६४ हजार हेक्टर आहे. तर सोयाबीन ६३७५४, भात ४९ हजार, भुईमूग ३८२२७, ज्वारी २४२०३, मका १८५९८, नाचणी ५८८७ हेक्टर असे प्रमुख पिकांचे क्षेत्र आहे. गळीत धान्याचे क्षेत्र हे १ लाख ४ हजार हेक्टरवर आहे. ही पिके विविध तालुक्यांत पावसाच्या प्रमाणात घेतली जातात. पूर्व भागात बाजरी हेच प्रमुख पीक राहते. त्याचबरोबर मका, सोयाबीन अन् गळीतधान्ये काही प्रमाणात घेतली जातात. तर पश्चिमेकडे भात, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग या पिकांना प्राधान्य दिले जाते.
जिल्ह्यात आतापर्यंत पावसाचे प्रमाण विसंगत राहिले आहे. पूर्व भागात वळवाचा आणि माॅन्सूनपूर्व पाऊस कमी झाला. तर माॅन्सूननेही दमदार हजेरी लावली नाही. आता तर पावसाचा खोळंबा आहे. तर पश्चिम भागात मागील १० दिवसांपूर्वी दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे पेरण्या सुरू आहेत. काही ठिकाणच्या पेरण्या पूर्णही झाल्या असून भांगलणीची कामे सुरू आहेत.
जिल्ह्याचे खरीप हंगाम एकूण सर्वसाधारण क्षेत्र ऊस वगळून ३ लाख १६ हजार हेक्टरवर असले तरी आतापर्यंत २ लाख १२ हजार ५६९ हेक्टरवर पेर झाली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ६७.१२ आहे. आतापर्यंत सातारा तालुक्यात ७०.५० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर जावळीत ५७.२२, पाटणला ८२ टक्के क्षेत्रावर पेर झाली. तसेच कऱ्हाडला ५९.७९ टक्के, कोरेगाव ४५.५४, खटाव ६०.८०, माण ८३.७२, फलटण ६७.८४, खंडाळा ४९.५८, वाई ६३.८३ आणि महाबळेश्वर तालुक्यात ५३.२३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
चौकट :
पीक सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
(हेक्टर) (हेक्टर)
भात ४९०८९ २७६४६ ५६.३२
ज्वारी २४२०३ १३२९३ ५४.९२
बाजरी ६४००९ ३२९५२ ५१.४८
मका १८५९८ १०२५९ ५५.१६
नाचणी २३८६ ६३१ ३६.६३
भुईमूग ३८२२७ २६४९५ ६९.३१
सोयाबीन ६३७५४ ५९६७९ ९३.६१
...................................................................