सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस चांगला असला तरी पूर्वेकडे अजूनही प्रतीक्षाच आहे. त्यामुळे पूर्वेकडील पेरणीला खोळंबा असला तरी पश्चिम भागात पेरणीने वेग घेतला आहे. भात लावणीची कामे सुरू असून, जिल्ह्यात आतापर्यंत ३५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या बाजरीची पेरणी पावसाअभावी रखडली आहे. दरम्यान, पावसाच्या विसंगतीमुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कही गमी, कही खुशी’ असे चित्र आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा असतो. या हंगामातील जिल्ह्याचे ऊस वगळून सर्वसाधारण क्षेत्र हे ३ लाख १६ हजार ७०१ हेक्टर आहे. यामध्ये बाजरीचे सर्वाधिक ६४ हजार हेक्टर, सोयाबीन ६३,७५४, भात ४९ हजार, भुईमूग ३८,२२७, ज्वारी २४,२०३, मका १८,५९८, नाचणी ५,८८७ हेक्टर असे प्रमुख पिकांचे क्षेत्र आहे. तर गळीतधान्याचे क्षेत्र हे १ लाख ४ हजार हेक्टरवर आहे. ही पिके विविध तालुक्यांत पावसाच्या प्रमाणात घेतली जातात. पूर्व भागात बाजरी हेच प्रमुख पीक राहते. त्याचबरोबर मका, सोयाबीन अन् गळीतधान्ये काही प्रमाणात घेतली जातात. तर पश्चिमेकडे भात, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग या पिकांना प्राधान्य दिले जाते.
जिल्ह्यात आतापर्यंत पावसाचे प्रमाण विसंगत राहिले आहे. पूर्व भागात वळवाचा आणि मान्सूनपूर्व पाऊस कमी झाला. तर मान्सूननेही दमदार हजेरी लावली नाही. आता तर पावसाचा खोळंबा आहे. पश्चिम भागात मागील आठवड्यात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्या सुरू आहेत. काही ठिकाणच्या पेरण्या पूर्णही झाल्या असून, भांगलणीची कामे सुरू आहेत.
जिल्ह्याचे खरीप हंगामातील एकूण सर्वसाधारण क्षेत्र ऊस वगळून ३ लाख १६ हजार हेक्टरवर असले तरी आतापर्यंत १ लाख ११ हजार ४५० हेक्टरवर पेरणी झाली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ३५.१९ आहे तर जिल्ह्याचे ऊसासह सर्वसाधारण क्षेत्र हे ३ लाख ८२ हजार हेक्टर आहे. आतापर्यंत एकूण सर्वसाधारण क्षेत्रानुसार सातारा तालुक्यात ६४.४७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर जावळीत २६.७२, पाटणला ५७.१७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच कऱ्हाडला ७६.७७ टक्के, कोरेगाव ४४.८७, खटाव २७.४३, माण ३७.७५, फलटण८६.०३, खंडाळा ५०.९९, वाई ४०.६३२ आणि महाबळेश्वर तालुक्यात ९.५५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे दिसून आले आहे.
चौकट :
पीक सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
(हेक्टर)
भात ४९०८९ १४३४४ २९.२२
ज्वारी २४२०३ ११०१९ ४५.५३
बाजरी ६४००९ १५४७९ २४.१८
मका १८५९८ ४९१५ २६.४३
नाचणी ५८८७ ८७८ १४.९१
भुईमूग ३८२२७ १७३९२ ४५.५०
सोयाबीन ६३७५४ ३९४८२ ६१.९३
...................................................................