शेंद्रे ,दि. ११ : शासनाकडून सोयाबिनला निर्धारीत दर दिला जात आहे. मात्र, दुसरीकडे सोयाबीन खरेदीसाठी घालण्यात आलेल्या जाचक अटींची पूर्तता करताना सातारा तालुक्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत. खरेदीअभावी सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून असून पीक घरात... उधारीवाले दारात अशीच परिस्थिती सर्वत्र दिसू लागली आहे.
सातारा तालुक्यातील शेंद्र्रे व आसनगाव परिसरात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाही या पिकाचे शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घेतले आहे. शासनाने प्रत्येक तालुका खरेदी-विक्री संघामार्फत सोयाबीन पिकाची खरेदी प्रति क्विंटल ३ हजार ५० रुपये दराने सुरू केली आहे. परंतु खरेदी-विक्री केंद्र्रांवर सोयाबीन खरेदीसाठी अनेक निकष लावण्यात आले आहेत.
परिणामी या पीकाची काढनी व मळनी होऊन महिला उलटला तरी शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच पडून आहे. जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचनींचा सामना करावा लागत आहे. अटींची पूर्तता न केल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन घेऊन पुन्हा माघारी यावे लागत आहे.
सोयाबीन काढणीस एकरी तीन ते चार हजार रुपए तर मळनीस एका पोत्यास २५० ते ३०० रुपये एवढा खर्च येतो. बहुतांश शेतकरी सोयाबीन पिकाची काढनी, मळनी व मशागत उधारीवर व बोलीवर करतात.
काढणी झाल्यावर लगेचच पिकाची विक्री करून देणी भागविली जातात. परंतु विक्रीअभावी सोयाबीन घरात पडून राहिल्याने पीक घरात... उधारीवाले दारात असे चित्र सध्या सातारा तालुक्यात दिसू लागले आहे.
एकीकडे शेतकरी अडचणीत आला असताना खासगी व्यापारी मात्र गुपचुप कमी दराने सोयाबीनची खरेदी करत आहेत. घरात पडून राहण्यापेक्षा शेतकरी नाईलाजाने प्रति क्विंटल २ हजार ५०० इतक्या कमी दरात सोयाबीनची खासगी व्यापाऱ्यांना विक्री करीत आहेत. शासनाचे या जाचक अटी शिथील कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.खरेदीसाठी निकष
- सोयाबीनमध्ये घाण, माती नसावी
- स्वच्छ चाळणी केलेला असावा
- आद्रतेचे प्रमाण १२ टक्के पेक्षा कमी असावे
- दर्जा एफएक्यू (पिवळा) असावा
- साताबाऱ्यावर सोयाबीनची चालू वर्षाची नोंद असावी
जाचक अटींची पूर्तता करताना शेतकरी मेटाकुटीला येत आहे. त्यामुळे शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात सोयाबीन विक्री करीत आहे. शासनाने जाचक अटी शिथील करून सरसकट खरेदी सुरू करावी.- महेंद्र्रकुमार मुळीक,शेतकरी, सोनगाव.