कार्वे : कऱ्हाड तालुक्यातील कार्वे विभागात खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. विभागात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली असून, सध्या पिकाला पोषक वातावरण आहे. चांगला दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
सोयाबीन हे नगदी पीक असून, यापासून खाद्यतेल बनविले जाते. बाजारपेठेत सोयाबीनला दरवर्षी मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या बाजारपेठेत सोयाबीनचा प्रतिक्विंटल दर सात ते आठ हजार रुपये आहे. हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो. दरवर्षी शेतकरी चांगल्या दराच्या अपेक्षेने सोयाबीनचे उत्पादन घेतात. मात्र, सुरुवातीला सात-आठ हजारांवर असणारा दर लगेचच दोन ते तीन हजारांपर्यंत खाली येतो. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होते. यावर प्रशासनाचा कसलाही अंकुश असल्याचे दिसत नाही. शेतकरी आपल्या शेतात अहोरात्र राबत असतात; मात्र, ज्यावेळी त्याच्या कष्टाचा मोबदला देण्याची वेळ येते, त्यावेळी व्यापारी, दलाल शेतमालाचा दर ठरवतात. कमी दरात शेतकऱ्याला आपला माल व्यापारी अथवा दलालांना द्यावा लागतो. जर व्यापारी आणि दलाल शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असतील, तर बाजार समिती काय करते, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
सध्या सोयाबीन खाद्यतेलाचे भाव कडाडले आहेत. त्यावर कोणी काहीही बोलायला तयार नाही. मात्र, ज्यावेळी शेतकरी उत्पादित सोयाबीन बाजारपेठेत घेऊन जातो, तेव्हा दर नसल्याचे सांगून व्यापारी कमी पैशात त्याचा माल खरेदी करतात. या प्रकाराला आळा कसा बसणार? याविरोधात कोण आवाज उठवणार? शेतकरी संघटना आंदोलनाची भाषा करते; मात्र प्रत्यक्षात त्याचे फलित काय, हाही प्रश्न आहे. दरवर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा पाय खोलात जात असून, सोयाबीनला चांगला दर मिळावा, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
फोटो : १९केआरडी०३
कॅप्शन : कार्वे (ता. कऱ्हाड) विभागात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढले असून, सध्या पीक जोमात आहे. (छाया : युवराज मोहिते)