सातारा : मागील महिन्यापासून खाद्यतेलाचा दर कमी झाला होता. पण, चीनने खरेदी वाढविल्याने सोयाबीन व पामतेलाच्या दरात डब्यामागे सरासरी १०० रुपये वाढ झाली तर उन्हाळा शेंगदाणा आल्याने शेंगतेलाच्या भावात थोडा उतार आला आहे. त्याचबरोबर पावसामुळे शेतातून बाहेर भाजीपाला काढणे अवघड झाल्याने आवक कमी होत चालली आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी ४६७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली तर कांद्याची १३१ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला ५०० रुपयांपासून २ हजारांपर्यंत दर मिळाला. तर वांग्याचा दर स्थिर असल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला १५० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला १०० ते १२० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला १०० ते १५० रुपये भाव मिळाला. आल्याला क्विंटलला १,५०० रुपयांपर्यंत तर लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले. या दोन्हीचे भाव मागील १५ दिवसांपासून स्थिर आहेत. मात्र, वाटाणा उतरला आहे.
खाद्यतेल बाजारभाव...
मागील महिन्यापासून खाद्यतेलाचे दर कमी झाले होते. मात्र, मागील आठवड्यात सोयाबीन व पामतेल दरात थोडी वाढ झाली. सूर्यफूल तेल डबा २,३५० ते २,४५० रुपयांना मिळत आहे. शेंगदाणा २,३०० ते २,४००, सोयाबीनचा डबा २,३५० ते २,४०० आणि पामतेलचा डबा १,९५० रुपयांना मिळत आहे. सोयाबीन, पामतेल पाऊचमागेही वाढ झाली आहे.
डाळिंबाची आवक...
बाजार समितीत आंबा, डाळिंब, पपई, सफरचंदाची आवक होत होती. पण, रविवारी फक्त डाळिंबाची ६ क्विंटलची आवक झाल्याचे दिसून आले.
कोबी स्वस्तच...
बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर स्थिर आहेत. मात्र, कोबी आणि बटाट्याला भाव कमी आहे. कोबीला १० किलोला ६० ते ७० आणि बटाट्याला १२० ते १४० रुपये भाव मिळाला. भेंडीला १५० ते २००, शेवगा शेंग ३०० ते ४००, पावटा २०० ते २५० आणि गवारला १५० ते २०० रुपये दर १० किलोला मिळाला.
प्रतिक्रिया...
आंतरराष्ट्रीय बाजारात चीनने खाद्यतेल खरेदी वाढवली. याचा परिणाम म्हणून आपल्याकडे सोयाबीन व पामतेल दरात वाढ झाली आहे. आजही आपण ७० टक्के खाद्यतेलाची आयात करतो.
- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी
मागील आठवड्यापासून पाऊस आहे. सातारा, जावळी, कऱ्हाड यासारख्या तालुक्यांतून भाजीपाला येत आहे. पण, पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याचे दिसून येत आहे. भाजीपाला चांगला बघून खरेदी करावा लागतो.
- शांताराम काळे, ग्राहक
पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्यातून बाहेर काढून भाजीपाला बाजार समितीत आणावा लागतो. तरीही कोबी, टोमॅटो तसेच इतर भाज्यांना म्हणावा तसा दर मिळत नाही. पाऊस आणि दर नसल्याने नुकसान सोसावे लागत आहे. - तुकाराम पाटील, शेतकरी
..........................................................................................................................................................................................