कोपर्डे हवेली
गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने, कराड उत्तर पूर्व विभागात सोयाबीन काढणीस सुरुवात झाल्याचे चित्र शिवारात दिसत आहे. कराड उत्तर पूर्व विभागातील काही भाग जिरायती विभाग म्हणून ओळखला जातो. या विभागात खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून सोयाबीन ओळखले जाते. सोयाबीनची काढणी करून शेतकरी रब्बी हंगामातील शाळूचे पीक घेतात. गत वर्षाच्या सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने, या हंगामात सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
पेरणी करून आणि सरीच्या भुंड्यावर हे पीक घेतले जाते. गत आठवड्यात पाऊस असल्याने, काही शेतकऱ्यांचे पीक काढणीस आले होते. सध्या पावसाने उघडीप दिल्याने काही शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीस आल्याने त्याची सुरुवात झाली आहे. काढणी करून काही शेतकरी त्याची मळणी लगेच करतात, तर काही शेतकरी काढणी करून त्याची गंज लावतात. गंज लावल्याने चांगले वाळते. त्याची मळणी दोन महिन्यांनी केली जाते. सोयाबीन काढून जमीन शाळू पिकासाठी शेतकरी मेहनत करून तयार करतात व नंतर शाळू पिकाची पेरणी केली जाते.
चौकट.
सध्या सोयाबीनला चांगला दर असल्याने काही शेतकरी बाजारपेठेत घालत आहेत, तर काही सोयाबीनची काढणी करून गंजी लावत आहेत.