पिंपोडे बुद्रुक , दि. २७ : परिसरात गेल्या काही दिवसांत बऱ्याच काळ लागून राहिलेला पाऊस, त्यामुळे शेतीक्षेत्रावर तणांची झालेली बेसुमार वाढ, त्यातच मजुरांच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे खोळंबली असून, त्यावर त्वरित उपाय म्हणून शेती क्षेत्रावरील तणनियंत्रणासाठी शेतकऱ्यांद्वारे तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. अनेक शेतकरी जीव धोक्यात घालून शेतातील तणावर रासायनिक औषधांची फवारणी करत आहेत.
शेतीच्या उपलब्धतेमुळे शेतीवर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या घटत चालली असून, त्याचा नेमका परिणाम शेती क्षेत्रातील मनुष्यबळावर होत आहे. त्यामुळे शेतीचे पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय शेतकऱ्यांना शेतीकामासाठी पर्यायी परंतु घातक मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.
सद्य:स्थितीत शेतीक्षेत्रावर पिकांच्या तुलनेत जोमाने वाढणारी तणनाशके शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी झाली आहे. मजुरांच्या अपुऱ्या संख्येमुळे शेतकऱ्यांना नियत्रंणासाठी तणनाशकांचा वापर करावा लागत आहे.
एकूणच तणनियंत्रणासाठी तणणाशके हा सोपा व सुलभ किफायतशीर पर्याय असला तरी त्यांची गुंतागुंतीची रासायनिक संरचना लक्षात घेता तणनाशके ही शेतजमीन, पिके व मानवी आरोग्यासाठी घातक आहेत. पीकविरहित शेती क्षेत्रावरील वेगवेगळ्या तणांच्या नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.