सातारा : हॅलो, मी ॲक्सिस बँकेतून बोलतोय, असे सांगून क्रेडिट कार्डची लिमिट वाढविण्याच्या बहाण्याने साताऱ्यातील एका महिलेची १ लाख ७ हजार ३५३ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तृप्ती प्रसन्न साळुंखे (रा. करंजे, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, साळुंखे यांच्या मोबाईलवर दि. १५ मार्चरोजी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने ॲक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगून, साळुंखे यांना त्यांच्या क्रेडिट कार्डचे लिमिट वाढविण्यासाठी तसेच साडेनऊ हजार रुपयांचे गिफ्ट देण्यासाठी फोन केल्याचे सांगितले. त्यावर साळुंखे यांनी विश्वास ठेवत त्याच्यासोबत संभाषण सुरू ठेवले असता, त्याने त्यांच्या क्रेडिट कार्डच्या नंबरचे शेवटचे चार अंक विचारून घेतले. त्यानंतर तक्रारदार यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारून घेत, त्यांच्या क्रेडिट कार्डवरून दि. १५, १६, १८ मार्चरोजी एकूण तीनवेळा साळुंखे यांचे १ लाख ७ हजार ३५३ रुपये त्याच्या बँक खात्यावर वर्ग करून त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले.
पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे करत आहेत. जर कोणाला अशाप्रकारे फोन आले, तर त्यांना तुमच्या बँक खात्याबाबत अथवा वैयक्तिक कोणतीही माहिती न देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक पतंगे यांनी केले आहे.