लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यानिहाय बाधितांच्या संख्येनुसार टॉप टेन व टॉप बॉटम गावांची यादी तयार करण्यात आली आहे. या गावांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात विनापास फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशाराही पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत नाही. त्यामुळे कडक निर्बंध लावले आहेत. त्यामध्ये गंभीर आजारपण किंवा जवळच्या नातेवाइकाचा मृत्यू या कारणाव्यतिरिक्त संचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर दहा हजार दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी अधीक्षक बन्सल यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये कुठेही विनाकारण फिरणाऱ्यावर कडक कारवाई होणार आहे.
त्याचबरोबर प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय कोरोना संसर्गाच्या बाधितांच्या संख्येनुसार टॉप टेन व टॉप बॉटम गावांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या गावांवर प्रभारी अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष राहणार आहे. सरंपच व ग्रामसंरक्षण समितीच्या मार्फत या गावात विनाकारण फिरणारे, विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. जादा संख्या असलेल्या गावांमध्ये गृहविलगीकरणात असलेले बाहेर पडणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार आहे. त्याचबरोबर कमी संख्या असलेल्या गावांतील बाधितांचा आकडा शून्यावर येण्यासाठी येथील निर्बंध कडक करण्यात येणार आहेत. त्याबाबत अधीक्षकांनी प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.