काँग्रेस पक्ष बळकटीसाठी साताऱ्यात सर्व तालुक्यांना विशेष प्रभारी; बूथ, मंडळ अन् ग्राम समिती स्थापन करणार

By नितीन काळेल | Published: October 21, 2023 06:40 PM2023-10-21T18:40:34+5:302023-10-21T18:47:04+5:30

आता विभागांची होणार बैठक..

Special in charge of all taluks to strengthen Congress party in Satara | काँग्रेस पक्ष बळकटीसाठी साताऱ्यात सर्व तालुक्यांना विशेष प्रभारी; बूथ, मंडळ अन् ग्राम समिती स्थापन करणार

काँग्रेस पक्ष बळकटीसाठी साताऱ्यात सर्व तालुक्यांना विशेष प्रभारी; बूथ, मंडळ अन् ग्राम समिती स्थापन करणार

सातारा : सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बूथ, मंडळ आणि ग्राम समिती स्थापन करण्यासाठी सर्व तालुक्यांना विशेष प्रभारी (निरीक्षक) नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी दिली आहे. यामुळे काँग्रेसची ताकद वाढू शकते.

सातारा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीत पक्षाची बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, ज्येष्ठ नेते अॅड. विजयराव कणसे, बाबासाहेब कदम, अजित पाटील-चिखलीकर, शिवराज मोरे, मनोहर शिंदे, प्रा. विश्वंभर बाबर, निवास थोरात, रजनी पवार, राहुल चव्हाण, अमित जाधव, प्राची ताकतोडे, विद्या थोरवडे, नीलम येडगे, छायादेवी घोरपडे, गिंताजली थोरात, रफिक बागवान आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘तालुकास्तरावर पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आहे. प्रत्येक तालुक्यात बूथ कमिटी, मंडळ कमिटी आणि ग्राम समित्या एक महिन्याच्या आत स्थापन कराव्यात. ज्यांच्यावर प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी जबाबदारीच्या तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटात बैठका घेऊन समित्या स्थापन कराव्यात.

दरम्यान, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीने मागील दहा दिवसांत पक्ष संघटना वाढीसाठी तीन बैठका घेतल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते आणि तरुण कार्यकर्त्यांची मोट बांधून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी पायाभरणी सुरू केलेली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः उपस्थित राहून पक्ष मजबुतीसाठी लक्ष घातल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे.

आता विभागांची होणार बैठक...

पक्ष संघटनेचा भाग म्हणून महिला आघाडी, युवक काँग्रेस, सेवादल या आघाड्यांची तर ओबीसी विभाग, अल्पसंख्यांक विभाग आणि अनुसूचित जाती जमाती सेल यांची पुढील आठवड्यात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्ण दिवस बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामाध्यमातूनही पक्षाची ताकद वाढविण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

Web Title: Special in charge of all taluks to strengthen Congress party in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.