सातारा : कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून, काॅन्टॅक्ट ट्रेसिंग करताना प्रशासन हतबल होत आहे. कोण, कुठे संपर्कात आला, हे समजेनासे झाले आहे. मात्र, असे असतानाही आरोग्य विभागाकडून काॅन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू करण्यात आले आहे. परंतु फारशी गती नसल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात गतवर्षी मार्च महिन्यामध्ये पहिली लाट आली. त्या वेळी नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. एक रुग्ण बाधित आढळून आल्यानंतर तो कोणाकोणाच्या संपर्कात आला, याची संपूर्ण माहिती काढली जात होती. परंतु तेव्हा पोलिसांपासून महसूल कर्मचारी आणि आरोग्य विभाग असा भला मोठा ताफा होता. मात्र, सध्याची परिस्थिती याउलट आहे. जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना काॅन्टॅक्ट ट्रेसिंगला मात्र गती येईना. परंतु तरीही आपल्या परीने आरोग्य विभागाकडून बाधिताच्या संपर्कात किती लोक आले, याची माहिती घेतली जात आहे. एका बाधिताकडून साधारण नऊ लोकांपर्यंत आरोग्य विभाग पोहोचत आहे. मात्र, तिथून पुढची साखळी शोधण्यास आरोग्य विभागाला मनुष्यबळाअभावी अडचणी येत आहेत. गतवर्षी जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीला होते. सध्या केवळ आरोग्य कर्मचारीच काॅन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये गुंतले असल्याचे पाहायला मिळत आहे.
चाैकट : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती
कोरोनाचे एकूण रुग्ण- ५८६८६
बरे झालेले रुग्ण-५५६९८
उपचार सुरू असलेले रुग्ण- ११३६
कोरोना बळी- १८५२
चाैकट : पस्तीस वर्षीय युवक काही दिवसांपूर्वी मुंबईहून गावी आला. त्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू झाले. या रुग्णाच्या संपर्कात कोण आले, हे तपासून आरोग्य विभागाने त्याच्या घरातल्या लोकांना क्वारंटाइन केले. मात्र, हा युवक मुंबईहून आल्यामुळे त्याच्या संपर्कात तेथे कोण आले, हे समजले नसल्याचे त्या युवकाने लोकमतशी बोलताना सांगितले.
चाैकट : आमच्या गावामध्ये एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये प्रचंड गर्दी होती. लोकांनी तोंडाला मास्क लावले नव्हते. त्यामुळे बरेच जण पाॅझिटिव्ह आढळून आले. आमच्या संपर्कात आता नेमके कोण आले, हे समजले नाही. पण खबरदारी म्हणून घरातल्या लोकांना क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे एका बाधित रुग्णाने सांगितले.
चाैकट : मला गावातील एका युवकामुळे कोरोनाची बाधा झाली. त्या युवकाला त्याच्या नातेवाइकांकडून झाली. असे बारा लोक एकमेकांच्या संपर्कात आले. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. आमच्यामुळे कोणाला पुन्हा बाधा येऊ नये म्हणून आम्ही खबरदारी घेतली असल्याचे कोरोनाबाधित रुग्णाने सांगितले.
कोट : काॅन्टॅक्ट ट्रेसिंग सध्या योग्य पद्धतीने सुरू आहे. एका रुग्णापासून नऊ लोकांपर्यंत आम्ही पोहोचत आहोत. पूर्वी मनुष्यबळ प्रचंड होते. परंतु आता केवळ आमच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवरच काॅन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.
- डाॅ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा