औंध : खटाव तालुक्यातील सरपंच निवडी दि. २६ आणि २७ रोजी होणार असून, सरपंच निवडीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. आपापल्या विचारांचा सरपंच, उपसरपंच होण्यासाठी नेतेमंडळी सरसावली आहेत.
खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका काही ठिकाणी बिनविरोध झाल्या, तर काही ठिकाणी मोजक्या सदस्यांच्या अन्य ठिकाणी चुरशीच्या लढती पाहावयास मिळाल्या. निवडणुका झाल्या, सदस्य निवडून आले आणि त्यानंतर सरपंच आरक्षण पडले. त्यालाही स्थगिती देण्यात आल्यानंतर फेरआरक्षण काढण्यात आले. या सर्व घडामोडीनंतर अखेर आजपासून दोन दिवसांत तालुक्यातील सर्व कारभारी ठरणार आहेत.
निवडून आलेल्या सदस्यांची मनधरणी करून पॅनलप्रमुखांना अक्षरशः घाम फुटला आहे, तर अटीतटीच्या लढतीच्या ठिकाणचे सदस्य सहलीवर रवाना झाले आहेत. तर, दुसरीकडे आपल्या विचारांच्या, पक्षांच्या जास्तीतजास्त ग्रामपंचायती असाव्यात, यासाठी नेतेमंडळींची फिल्डिंग सुरू आहे.